पावसामुळे नगर-कोपरगाव महामार्गाची झाली गटार गंगा

खड्डे बुजविण्यासाठी पुन्हा मातीचा वापर
पावसामुळे नगर-कोपरगाव महामार्गाची झाली गटार गंगा

पिंपरी निर्मळ l वार्ताहर

उत्तर नगर जिल्ह्याच्या विकासासाठी संजीवनीचे काम करणारा नगर-कोपरगाव महामार्गाची पावसाचे पाणी साचल्याने गटारगंगा झाली आहे. दुरूस्तीसाठी खोदलेल्या साईडपट्ट्यात पावसाने तंडुब भरल्या आहेत तर रस्त्यावर पडलेले खड्डे माती टाकुन बुजविण्याचा केविलवाणा प्रयत्न राष्ट्रीय महामार्ग विभाग करताना दिसत असून ऐन पावसाळ्यात हा मार्ग प्रवाशांसाठी मृत्युचा सापळा बनला आहे.

नगर-कोपरगाव या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. जुलै २०२१ मध्ये हा रस्ता केंद्राने ताब्यात घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग केला. रस्ता चौपदरीसाठी जवळपास पाचशे कोटींचे टेंडर यासाठी निघाले. काम घेतलेल्या ठेकेदार कंपनीने हा रस्ता ठिकठिकाणी दोन्ही बांजूनी खोदून ठेवला व काम मध्येच सोडून ठेकेदाराने पळ काढला. मात्र खोदलेल्या साईडपट्ट्या प्रवाशांसाठी मृत्युचा सापळा बनल्या आहेत.

त्यातच जोरदार पाऊस होत असल्याने या साइडपट्ट्या पावसाने भरल्या आहेत. रस्त्यावरही मोठमोठे खड्डे पडल्याने हा रस्ता आहे की ओढ़ा असा प्रश्‍न प्रवाशांना पडत आहे. केंद्राकडे वर्ग झाल्याने रस्त्यांची दुर्दशा संपेल असा गोड समज झालेल्या प्रवाशांना मात्र आयुष्यातून उठविण्याचे काम या रस्त्यामुळे होत आहे. आपले अपयश लपविण्यासाठी रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाकडून खड्ड्यामध्ये माती टाकण्याची नामुष्की आली आहे.

पावसाने या चिखलाचा गाळ होणार आहे तर पाऊस उघडल्यावर धुळ उडणार असल्याने अपघांताचे प्रमाण आणखी वाढणार आहे. जिल्ह्यात एवढा महत्वपूर्ण असलेल्या रस्त्याबाबत शासन एवढे बेजबाबदार कसे काय असू शकते, असा संतप्त सवाल प्रवांशामधून विचारला जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com