नगर-कोपरगाव रस्ता दुरूस्तीसाठी डांबराऐवजी काळ्या तेलाचा वापर

चौकशी करा
नगर-कोपरगाव रस्ता दुरूस्तीसाठी डांबराऐवजी काळ्या तेलाचा वापर

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

बहुचर्चित नगर-कोपरगाव राष्ट्रीय महामार्गाच्या दुरूस्तीचे काम सुरू झाले आहे. मात्र या रस्त्याची साडेसाती संपण्याचे नाव घेत नसून पिंपरी निर्मळ परिसरात खड्डे बुजविताना कंत्राटदाराने खड्ड्यात डांबराऐवजी चक्क काळे तेल टाकले असल्याची तक्रार माजी सरपंच बाबासाहेब घोरपडे यांनी केली असून काम निकृष्टच करायचे होते तर करताच कशाला, असा सवालही उपस्थित केला आहे.

नगर-कोपरगाव या राष्ट्रीय महामार्गासाठी सव्वा चारशे कोटींची कामे हाती घेण्यात आली होती. मात्र मे 2022 मध्येच ठेकेदार संबंधित काम सोडून पसार झाला होता. त्यामुळे हे काम बंदच होते. ठिकठिकाणी केलेले खोदकाम व शिर्डी-कोल्हार परिसरात मोठमोठे खड्डे पडले असल्याने प्रवाशांचे मात्र हाल सुरू होते. या रस्त्याची दुरूस्ती व्हावी यासाठी प्रवाशांमधून जोरदार मागणी सुरू होती. नगर बायपास ते सावळीविहीर दरम्यानच्या अंतरावरील खड्डे दुरुस्तीसाठी 8.66 कोटींचे काम कंत्राटदाराला देण्यात आल्याची माहिती आहे.

संबंधित कंपनीकडून पिंपरी निर्मळ परिसरात सध्या खड्डे बुजविण्याचे काम करीत आहे. मात्र खड्डे बुजविताना या खड्ड्यामध्ये डांबराऐवजी चक्क काळे तेल टाकत असल्याची तक्रार माजी सरपंच बाबासाहेब घोरपडे याने केली. डांबराऐवजी काळे तेल टाकून रस्ते दुरूस्तीचे नवीन तत्रंज्ञान कधी आले, असा सवाल करीत जर काम निकृष्टच करायचे होते तर दुरूस्तीचा फार्स करताच कशाला, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या कामाची चौकशी व्हावी या आशयाचे निवेदन त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पाठविले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com