नगर-कोल्हार महामार्गावरील निळवंडेच्या पुलाचे काम सुरू

नगर-कोल्हार महामार्गावरील निळवंडेच्या पुलाचे काम सुरू

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

उत्तर नगर जिल्ह्यातील जिरायती व कायमच दुष्काळी टापुतील 182 गावातील शेतकर्‍यांना शेती सिंचनासाठी पाणी मिळावे यासाठी निळवंडे धरणाच्या मुख्य कालव्यांची कामे अंतीम टप्प्यात आहेत. पिंपरी निर्मळ शिवारातील अंत्य कालव्याची कामे प्रगतीपथावर आहे. मात्र नगर-कोल्हार चौपदरी रस्ता क्रॉसींग करणार्‍या पुलासाठी रस्ता खोदून दोन महिने झाले तरीही काम बंद होते. राहात्यातील टंचाई आढावा बैठकीत माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित अधिकार्‍यांची झाडाझडती घेतल्यानंनर दुसर्‍या दिवशीच या पुलाचे काम सुरू झाले असून परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.

उत्तर नगर जिल्ह्यातील राहाता, संगमनेर, कोपरगाव, राहुरी, अकोले, श्रीरामपूर तालुक्यातील कायमच दुष्काळी 182 गावातील 68 हजार हेक्टरवरील शेतकर्‍यांना शेती सिंचनासाठी पाणी मिळावे यासाठी निळवंडे धरणाचा प्रस्ताव करण्यात आला. कालव्यांच्या कामाने गती घेतली आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये या मुख्य कालव्यांची चाचणी करण्याचे जलसंपदा विभागाने जाहीर केले आहे.

या कालव्याच्या पिंपरी निर्मळ शिवारातील नगर-कोल्हार रस्ता क्रॉसिंग करणार्‍या पुलासाठी जवळपास सव्वादोन कोटी रूपयांच्या कामाची निविदा निघून दोन महिने झाले होते. कत्रांटदाराने रस्त्याच्या एका बाजूने रस्ता खोदला आहे. दोन महिने होवूनही पुढील कोणतेच काम सुरू झालेले नसल्याने या ठिकाणी चौपदरी असणारा रस्ता वन वे करण्यात आला आहे. या वन वेमुळे येथे कायमच वाहनांची गर्दी होत होती. खड्डा लक्षात न आल्याने रात्री या खड्ड्यात अनेक दुचाकीस्वार पडत असल्याने हा खोदलेला रस्ता मृत्युचा सापळा बनला होता. निळवंडे लाभधारक शेतकरी व प्रवांशामधून संताप व्यक्त होत होता.

माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहात्यातील टंचाई आढावा बैठकीत जलसंपदा विभागासह राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाच्या अधिकार्‍यांची झाडाझडती घेवून काम तातडीने सुरू करण्याचे आदेश केल्यानंतर दुसर्‍याच दिवशी या पुलाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे निळवंडे लाभधारक शेतकरी व प्रवांशामधून समाधान व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com