ओव्हरटेक करताना दोन वाहनांची समोरासमोर धडक

एक ठार
ओव्हरटेक करताना दोन वाहनांची समोरासमोर धडक

घारगाव |वार्ताहर| Ghargav

नगर-कल्याण महामार्गावर आळेगावच्या शिवारात लवणवाडी येथे शुक्रवारी मध्यरात्री सव्वाबारच्या सुमारास कार व पिकअप यांचा ओव्हरटेक करताना समोरा-समोर अपघात झाल्याने एकाचा मृत्यू झाला. प्रवीणकुमार नवनाथ आहेर (रा. पळसपूर, ता. पारनेर, जिल्हा अहमदनगर) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत आळेफाटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवारी रात्री सव्वाबाराच्या सुमारास सिद्धांत बाळासाहेब खंडागळे (रा. हसनापूर, ता. शेवगाव, जिल्हा अहमदनगर) हा त्याच्या ताब्यातील पिकअप एम. एच 16 सी. डी 0910 भरधाव वेगात आळेफाट्याच्या दिशेने घेऊन जात असताना ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणार्‍या सेलेरो एम. एच 46 बी. ई 0657 हिला जोराची धडक दिली. अपघात इतका जोराचा होता की, सेलेरो कारमधील चालक प्रवीण आहेर याचा जागीच मृत्यू झाला.

यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याप्रकरणी संतोष नवनाथ आहेर यांच्या फिर्यादीवरून अपघात घडवून जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी चालक सिद्धांत खंडागळे विरुद्ध आळेफाटा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रफिक तडवी पुढील तपास करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com