नगरकरांनो पाणी जपून वापरा, कारण...

नगरकरांनो पाणी जपून वापरा, कारण...

अहमदनगर (प्रतिनिधी)

नव्याने टाकण्यात आलेल्या पाईपलाईनला जुनी लाईन जोडण्याचे काम उद्या गुरूवारी हाती घेण्यात आले आहे. 17 तास चालणार्‍या या जोडजाडीमुळे शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे. शनिवारपासून पाणी पुरवठा पूर्ववत सुरू होईल अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली.

नगर शहराला मुळा धरणातून पाणी पुरवठा केला जातो. शहर पाणीपुरवठा योजनेवरील महत्त्वाच्या देहरे येथे नवीन व जुनी दोन्ही मुख्य जलवाहिनीला नव्याने टाकण्यात आलेली एम एस 1100 एम एम व डीआय 700 एम एम जोडण्यात येणार आहे. त्यासाठी गुरूवारी सकाळी 10 वाजेपासून ते शुक्रवारी पहाटे 3 वाजेपर्यंत बंद राहणार असल्याने शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता येणार नाही.

दरम्यानच्या काळात दोन्ही मुख्य जलवाहिनीद्वारे मुळानगर येथून होणारा पाणी उपसा बंद राहणार असल्याने गुरुवारी (दि.8) बोलेगाव नागपूर सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोड परिसर, लक्ष्मी नगर, सूर्य नगर, निर्मलनगर व तसेच स्टेशन रोड परिसर, सारसनगर, मुकुंद नगर, केडगाव, नगर कल्याण रोड वरील शिवाजीनगर परिसर सकाळी 10 नंतरच्या पाणी वाटपाच्या भागास पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. परिणामी शुक्रवारी (दि.9) रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या भागास म्हणजेच झेंडीगेट, डाळ मंडई, रामचंद्र खुंट, काळू बागवान गल्ली, धरती चौक, माळीवाडा, कोठी, कलेक्टर कचेरी परिसर या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हिल हडको, प्रेमदान हडको, म्युनिसिपल हाडको व दुपारनंतर बुरुडगाव रोड परिसरात महानगरपालिके मार्फत पाणीपुरवठा करण्यात येणार नाही. या भागाला शुक्रवार ऐवजी शनिवारी (दि.10) पाणी पुरवठा केला जाणार आहे.

तसेच शनिवारी (दि.10) पाणीपुरवठा होऊ घातलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागास सर्जेपुरा, तोफखाना, सिद्धार्थ नगर, लाल टाकी, दिल्ली गेट, नालेगाव, चितळे रोड, ख्रिस्त गल्ली, कापड बाजार, माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर, स्टेशन रोड, आगरकर मळा, सारस नगर परिसर भागात पाणीपुरवठा होणार नसून तो रविवारी (दि.11) करण्यात येणार आहे. नगरकरांनी पाण्याचा वापर काटकसरीने करून महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com