नगर जिल्ह्यातील देवस्थानं अन् पर्यटनस्थळांना निधी

थकलेला पैसा मिळणार असल्याने विकास कामांना वेग येणार
नगर जिल्ह्यातील देवस्थानं अन् पर्यटनस्थळांना निधी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत सन 2012-13 ते सन 2019-20 या वित्तीय वर्षात प्रशासकीय मंजुरी दिलेल्या

जिल्हास्तरावर कामांना स्पिलओव्हरची रक्कम 2020-21 मध्ये सत्तर कोटी एकोणतीस लाख अकरा हजार रूपये वितरीत करण्यास शासन मान्यता दिली आहे. यात नगर जिल्ह्यातील नेवाशातील श्रीक्षेत्र देवगड देवस्थान, श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द येथील श्रीक्षेत्र हरिहरेश्वर केशव गोविंद संस्थान, नगर येथील भूईकोट किल्ला, पाथर्डीतील मोहटा देवी देवस्थान, उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेले भंडारदरा धरण परिसर, अगस्ती ऋषी देवस्थानांचा समावेश आहे.

दरम्यान, हा निधी रखडल्यामुळे पर्यटन, देवस्थानांची विकास कामे थांबली होती. पण आता थकलेला हा निधी मिळत असल्याने विकास कामांना चालना मिळणार आहे.

पर्यटन विकासासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. त्या पार्श्वभूमीवर उपक्रम राबविले जात आहेत. त्यात पर्यटकांचा पर्यटनाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी, विविध विकास कामे करण्यासाठी निधी दिला जात आहे. त्यातून नगर जिल्ह्यासह राज्यभरातील पर्यटन बहरण्यास हातभार लागणार आहे.

नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड देवस्थानच्या क्राँक्रीट रस्ते बांधकामासाठी 49 लाख 9 हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच यात्री निवासस्थान इमारत बूधणे, संरक्षण भिंत व अन्य कामांसाठी 1 कोटी 141 लाख 12 हजार रूपयांचा निधी मिळणार आहे.

अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण म्हणजे जिल्ह्याचा काश्मीरच. येथील सौंदर्य न्याहाळण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे येथील विकास कामांनाही 3 कोटींचा निधी वितरीत करण्यात येणार आहे. भंडारदरा ते शेंडी दरम्यान तीव्र उतार व वळणाच्या रस्त्यास वाहतूक सुरक्षा उपाययोजना करणे, पर्यटकांसाठी स्वच्छतागृहे बांधणे, आंब्र्रेला फॉलखाली लोखंडी पादचारी पूल तयार करणे, स्वच्छतागृहांचे विद्युतीकरण व अन्य कामांसाठी हा निधी देण्यात येत आहे. या तालुक्यातील अगस्ति ऋषि देवस्थानच्या भक्तनिवास इमारत, नदी किनारी घाट, शुध्द पाणी पुरवठा व अन्य कामांसाठी 50 लाख रूपये.

श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द येथील श्रीक्षेत्र हरिहरेश्वर केशव गोविंद संस्थानच्या बहुउद्देशिय सभागृह, बगिचा, रंगीत कारंजे, कार्यालय इमारत व अन्य कामांसाठी 1 कोटी 50 लाखांचा निधी देण्यात येणार आहे.

नगरमधील ऐतिहासिक महत्व असलेला भुईकोट किल्ला. येथील संरक्षक भिंत, स्वच्छता, पार्किंग व्यवस्था, रस्ते, इमारत या कामांसाठी 80 लाखांचा निधी वितरीत करण्यात येणार आहे. पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मोहाटे देवी देवस्थान अंतर्गत मोहाटा गाव ते मोहाटा देवी गट रस्ता (पालखी मार्ग) यासाठी 70 लाख रूपये. कर्जतमधील सिध्दटेक देवस्थानच्या दर्शन मंडप, स्वच्छतागृहे व अन्य कामांसाठी 25 लाख रूपये देण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे श्रीक्षेत्र भगवानगड 30 लाख, माहिजळगावातील भैरवनाथ देवस्थान 28 लाख, टाकळी खंडेश्वरी येथील आत्मारामगिरी महाराज मंदिर, थापलिंग देवस्थान, खर्डा येथील संत सीताराम उंडेगावकर, जवळातील जवळेश्वर देवस्थान, पाथर्डीतील सातवड येथील ढोलेश्व मंदिर परिसरातील विकास कामांना निधी देण्यात येत आहे.

- देवगड देवस्थान 1 कोटी 90 लाख

- भंडारदरा धरण 3 कोटी

- अगस्ति देवस्थान 50 लाख

- बेलापूर केशव गोविंद 1 कोटी 50 लाख

- भूईकोट किल्ला 80 लाख

- मोहाटा देवी देवस्थान 70 लाख

- सिध्दटेक 25 लाख

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com