नगर जिल्हा बँकेत आता 10.30 ते 2 पर्यंत व्यवहार

करोनामुळे बँकेच्या कामकाज वेळा बदलल्या
नगर जिल्हा बँकेत आता 10.30 ते 2 पर्यंत व्यवहार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यामध्ये कोविड 19 ची दुसरी लाट मोठ्या प्रमाणावर आली आहे. शासनानेही कडक स्वरूपात लॉकडाऊन जाहीर केले असून या पार्श्वभूमीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने बँकेच्या कामकाज वेळेत बदल केला आहे.

त्यानूसार 30 एप्रिलपर्यंत बँकेचे शाखांचे कामकाज ग्राहकांसाठी कॅश व्यवहार करण्यासाठी सकाळी 10.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत चालणार असल्याचे माहिती बँकेचे चेअरमन उदय शेळके आणि व्हॉईस चेअरमन माधवराव कानवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी दिली.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माध्यमातून जिल्ह्यातील 850 ते 900 विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या पात्र कर्जदार शेतकरी सभासदांना चालू वर्षाचे जनरल कर्ज मंजूर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध शाखाद्वारे खरिपाचे पिकांसाठीचे कर्ज वितरण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी जिल्हा बँकेला दिलेल्या पीक कर्जाची उद्दिष्ट प्रमाणे बँक कर्ज वाटप करणारच असून जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना व भगिनींना तसेच बँकेच्या इतर सर्व ग्राहकांना कोविड 19 पासूनचे स्वतःचे संरक्षण करून शाखांमध्ये गर्दी न करता सर्वांनी एकमेकाच्या सहकार्याने बँकिंग कामकाज चालवण्याची विनंती बँकेचे चेअरमन शेळके यांनी केली.

190 कर्मचारी बाधित अन् आठचे निधन

बँकेचे कर्मचारी व सोसायटीचे सचिव हे या परिस्थितीतही चांगले काम करत असून त्यांना सभासदांचे सहकार्य अपेक्षित आहेत. सध्या बँकेचे जवळपास 160 कर्मचारी करोना पॉझिटिव्ह निघाला आहे व 8 कर्मचारी निधन पावले आहेत. त्याच प्रमाणे 30 कंत्राटी कर्मचारी ही पॉझिटिव्ह असल्याची माहितीही चेअरमने शेळके यांनी दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com