400 रुग्णांची करोनावर मात
सार्वमत

400 रुग्णांची करोनावर मात

रविवारी आणखी 15 रुग्ण करोनामुक्त

Arvind Arkhade

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरासह जिल्ह्यात करोनाची रुग्णसंख्या वाढत असली, तरी करोनामुक्त झालेल्यांची संख्याही कमालीची वाढली आहे. रविवारी आणखी 15 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात महापालिका क्षेत्रातील 9, नगर ग्रामीण 4, संगमनेर आणि पारनेर प्रत्येकी 1 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे करोनावर रविवारअखेर तब्बल 400 जणांनी विजय मिळवला आहे. ही जिल्ह्यासाठी आनंदाची वार्ता आहे.

जिल्ह्यात रविवारअखेर 618 व्यक्तींना करोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी तब्बल 400 जणांनी करोनाला हरवून विजय मिळवला आहे. यात आरोग्य कर्मचार्‍यांचे योगदान मोठे आहे. करोनावर आपण मात करू शकतो, हे दोन वर्षाच्या बाळासह 90 वर्षांच्या वृद्धांनी दाखवून दिले आहे. देशाचे अर्थचक्र कोलमडल्याने लॉकडाऊनच्या काळात बहुतांश बंधने सैल करण्यात आली.

याचा अर्थ असा नाही, की करोनाचा धोका टळला आहे. त्यामुळे नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अधिक दक्षता घेण्याची गरज आहे. सध्या 201 जणांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 17 रुग्णांचा बळी करोनाने घेतलेला आहे. यासह रविवारी दिवसभरात 125 संशयित करोना रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com