करोनामुळे वाढली तोफखान्याची चिंता
सार्वमत

करोनामुळे वाढली तोफखान्याची चिंता

आतापर्यंत आठ पोलीस पॉझिटिव्ह

Arvind Arkhade

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील सावेडी उपनगराची शांतता-सुव्यवस्था सांभाळणार्‍या तोफखाना पोलीस ठाण्यात करोना वाढत असल्याने चिंता वाढली आहे. आतापर्यंत एक अधिकारी व सात कर्मचार्‍यांना करोना संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. यामुळे त्यांच्या संपर्कात आलेले अधिकारी कर्मचारी धास्तावले आहेत.

करोना रुग्ण वाढत असल्याने तीन दिवसांपासून कामकाजावर परिणाम झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस ठाणे सॅनिटायझर करणे, अधिकारी, कर्मचार्‍यांची दररोज ऑक्सिमीटरद्वारे तपासणी करणे, लक्षणे दिसल्यास तत्काळ करोना चाचणी करून घेण्यावर भर देण्यात आला आहे.

उच्चभ्रू लोकवस्ती असलेल्या सावेडीची जबाबदारी तोफखाना पोलीस ठाण्याकडे आहे. यामुळे या पोलीस ठाण्यात नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. जिल्ह्यातील 33 पोलीस ठाण्यांत गुन्ह्याच्या बाबतीत एक नंबरवर हे पोलीस ठाणे आहे. एक पोलीस निरीक्षक, तीन सहाय्यक निरीक्षक, तीन उपनिरीक्षक व शंभर कर्मचारी असे या पोलीस ठाण्याचे मनुष्यबळ आहे.

नागरिकांची नेहमी गर्दी असल्याने तोफखाना पोलीस ठाण्यात करोनाने शिरकाव केला. सुरूवातीला एक सहाय्यक निरीक्षक करोना बाधित आढळून आले होते. ते आत करोनामुक्त झाले आहेत. यानंतर एक महिला कर्मचारी, दोन दिवसांमध्ये पाच कर्मचारी व बुधवारी पुन्हा एक कर्मचारी करोना बाधित आढळून आल्याने आतपर्यंत आठ जणांना करोना संक्रमण झाले असल्याचे सिद्ध झाले आहे.

यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेकांची चाचणी करण्यात येत आहे. तोफखान्यातील गुन्ह्यांचे प्रमाण पाहता याठिकाणी कर्मचार्‍यांची संख्या कमी आहे. काही सुट्टीवर, काहींना करोना झाला असल्याने आता इतरांवर कामाचा व्याप वाढला आहे. करोना संख्या वाढू नये म्हणून सॅनिटायझर करणे, अधिकारी, कर्मचार्‍यांची दररोज ऑक्सिमीटरद्वारे तपासणी करणे, लक्षणे दिसल्यास तत्काळ करोना चाचणी करून घेण्यावर भर देण्यात आला आहे.

शुक्रवारी सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांची करोना चाचणी केली जाणार आहे. पोलीस ठाण्यात आलेल्या नागरिकांनी करोना चाचणी करून घ्यावी, फिर्याद दाखल करण्यासाठी एक किंवा दोनच व्यक्तींनी यावे, अशा सूचना पोलीस ठाण्यात लावण्यात आल्या आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com