शहरात 'या' तीन ठिकाणी होणार करोना मृतांवर अंत्यसंस्कार

सावेडीतील मनपाच्या भूखंडाची चाचपणी
शहरात 'या' तीन ठिकाणी होणार करोना मृतांवर अंत्यसंस्कार

अहमदनगर|Ahmedagar

मृत करोना रूग्णांवर नालेगाव अमरधाममध्ये अंत्यसंस्कार केले जात आहे. वाढत्या करोना संसर्गामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. नालेगाव अमरधामवर ताण आला आहे. त्यामुळे आता नालेगाव बरोबरच केडगाव व नवनागापूर येथील अमरधाममध्ये करोना मृत रूग्णांवर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

याशिवाय महापालिकेचा सावेडी उपनगरातील 15 एकरच्या भूखंडावर अंत्यसंस्कार करण्याची चाचपणी प्रशासनाकडून सुरू झाली आहे. गुरूवारपर्यंत त्याठिकाणी अंत्यसंस्काराची व्यवस्था केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

जिल्हाभरातून करोना उपचारासाठी रूग्ण नगर शहरात येतात. नगरमध्ये जिल्हा रूग्णालयासह मोठमोठी खाजगी रूग्णालय आहे. उपचारादरम्यान करोना रूग्णाचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर जवळच्या अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. मृत करोना रूग्ण नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास बंधने आहेत. यामुळे जिल्हा रूग्णालयासह खाजगी रूग्णालयात मृत झालेल्या करोना रूग्णांवर नालेगाव अमरधाममध्ये अंत्यसंस्कार केले जात आहे. नालेगाव अमरधाम परिसरात नागरी वस्त्या आहेत. या ठिकाणी अंत्यसंस्कारामुळे धुराचे लोट निघत असून यामुळे नागरी भागात राहणार्‍या लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहेत.

त्यामुळे करोना रूग्णांचे अंत्यसंस्कार स्थानिक गावात करावेत, अथवा शहराच्या बाहेर करावे, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हाधिकारी डॉ. भोसले व आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे केली होती. यासंदर्भात रविवारी आ. जगताप, जिल्हाधिकारी डॉ. भोसले व आयुक्त गोरे यांच्यात बैठक झाली. करोना मृत रूग्णांचे अंत्यसंस्कार स्थानिक ठिकाणी करता येणार नाही, तसे केल्यास करोना संसर्ग वाढण्याची भिती आहे.

यामुळे शहरातील रूग्णालयात मृत झालेल्या रूग्णांवर याच ठिकाणी अंत्यसंस्कार करणे आवश्यक असल्याची बाब जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आ. जगताप यांच्या निदर्शनास आणून दिली. यामुळे आता नालेगाव बरोबरच केडगाव, नवनागापूर येथील अमरधाममध्येही करोना मृतांवर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. सावेडी येथील भूखंडावर अंत्यसंस्काराची सोय केली जाणार असून त्यासाठी आयुक्त गोरे यांना जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आदेश दिले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com