आजपासून नगर शहरात कठोर उपाययोजना

करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस-महापालिकेचे संयुक्त पथके
आजपासून नगर शहरात कठोर उपाययोजना

अहमदनगर (प्रतिनिधी) - नगर शहरात दिवसेंदिवस करोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होत असल्याने शिस्तीचे पालन करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी कडक पावले उचलली जाणार आहेत. विनाकारण फिरणार्‍या, मास्कचा वापर न करणार्‍या, फिजिकल डिस्टन्स न पाळणार्‍यांवर आता कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी पोलीस प्रशासन व महापालिका यांचे संयुक्त पथक नियुक्त करण्यात आले आहे. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी केले आहे.

शहरात करोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने व शहरातील नवनवीन भागात दररोज करोना रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत असल्याने हा भाग प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत आहे. करोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी महापालिका, जिल्हा प्रशासन व शहर पोलीस आटोकाट प्रयत्न करत आहेत. मधल्या काळात लॉकडाऊनमध्ये शिथिलता केल्यानंतर लोक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू लागले आहेत. नागरिक फिजिकल डिस्टन्स, मास्क व सॅनिटायझरचा वापर करताना दिसून येत नाहीत.

जिल्हाधिकार्‍यांनी भादंवि कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू केला असला तरीही नागरिक सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर गर्दी करताना दिसून येत आहेत. वाहनांमध्ये जास्त प्रवासी वाहतूक करत विनापरवाना फिरताना दिसून येत आहेत. गुटखा, मावा खाऊन सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर थुंकण्याचे प्रमाणही कमी होताना दिसून येत नाही.

एकंदरीत नागरिक कोणत्याही नियमांचे पालन करताना दिसून येत नसल्याने प्रशासन हतबल झाले आहे. या सर्वांचा परिणाम करोना रुग्णवाढीवर होत आहे. आठवड्यात करोना रुग्णांचा आलेख वाढता आहे. करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस प्रशासन व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात फिरते पथक नेमण्यात आले आहे.

जे नागरिक शहरात विनाकारण फिरताना दिसतील, मास्क न वापरता फिजिकल डिस्टन्सचे पालन करणार नाहीत, वेळेनंतर दुकाने सुरू ठेवतात, रस्त्याच्या कडेला, दुकानामध्ये गर्दी करतात अशांवर हे फिरते पथक कारवाई करणार आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आहवान आयुक्त मायकलवार यांनी केले आहे.

करोनाचे रुग्ण असलेल्या भागात कंटेन्मेंट झोन जाहीर केला आहे. अशा प्रतिबंधात्मक क्षेत्रांमध्ये असलेल्या गरीब, मोलमजुरी करणारा वर्ग इत्यादीची उपासमार होऊ नये, म्हणून महापालिकेने पुन्हा सामाजिक संस्था, प्रतिष्ठित नागरिक, देणगीदार, अधिकारी यांच्या सहकार्याने 1 जुलैपासून कम्युनिटी किचन सुरू केले आहे. प्रतिबंधात्मक क्षेत्र असलेल्या सिद्धार्थनगर, नालेगाव, तोफखाना भागात दररोज एक हजार नागरिकांना फुड पॅकेट्सचे वाटप करण्यात येत आहे. देणगीदारांनीही यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

करोना रुग्ण वाढत असल्याने त्यांच्या संपर्कातील लोकांचे स्वॅब तपासणी घेण्याचे काम जिल्हा रुग्णालयात सुरू आहे. मात्र तेथे गर्दी होत असून, स्वॅब घेण्यास आणि पर्यायाने त्याचे अहवाल येण्यास विलंब होत आहे. त्यामुळे आता महापालिका शहरातील संशयितांचे स्वॅब घेण्यासाठी केंद्र सुरू करणार असल्याची माहिती प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी दिली. महापालिका घेतलेले स्वॅब तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात देणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com