नगर शहर शिवसेनेची लवकर फुटीच्या दिशेने वाटचाल ?

संपर्कप्रमुख कोरगावकरांच्या बैठकीला अनेकांची दांडी
नगर शहर शिवसेनेची लवकर फुटीच्या दिशेने वाटचाल ?

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यस्तरीय शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर त्याचे थोडे पडसाद नगर शहरात उमटले होते. त्यामुळे नगर शहर शिवसेना नेमकी कोणा मागे आहे, याचा संभ्रम निर्माण झाला होता. यापार्श्वभूमीवर मंगळवारी (19 जुलै) मात्र नगर शहर शिवसेना फुटण्याची चिन्हे स्पष्ट झाली व येत्या एक-दोन दिवसांतच त्यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नगर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांनी बोलावलेल्या बैठकीस शहरातील अनेक प्रमुख नगरसेवकांसह काही पदाधिकार्‍यांनी दांडी मारली. त्यामुळे येत्या एक-दोन दिवसांत नगरमधील काहीजण अधिकृतपणे मुख्यमंत्री शिंदेंचा झेंडा हाती धरणार, हे मात्र स्पष्ट झाले आहे.

राज्यातील शिवसेनेत ठाकरे व शिंदे असे दोन गट पडल्यावर जिल्हा शिवसेना व शहर शिवसेनेने नक्षत्र लॉन्समध्ये दक्षिण नगर जिल्ह्यातील नगरशहर, नगर तालुका व पारनेर येथील शिवसैनिकांचा मेळावा घेऊन ठाकरेंसमवेत राहण्याचे स्पष्ट केले, पण त्याचवेळी काही जणांनी शिंदेंचे समर्थनही कृतीतून केले. काहींनी थेट मुंबईत जाऊन त्यांची भेट घेतली. त्यामुळे जिल्हा शिवसेना नेमकी कोणामागे आहे, याचा संभ्रम होता. या पार्श्वभूमीवर सेना फुटीनंतर प्रथमच नगरला संपर्क प्रमुख कोरगावकर मंगळवारी आले व त्यांनी घेतली. या बैठकीला जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, शहर प्रमुख संभाजी कदम, मनपाचे नगरसेवक गणेश कवडे, श्याम नळकांडे, योगीराज गाडे, सचिन शिंदे, दत्ता जाधव, संजय शेंडगे, दीपक खैरे, स्मिता अष्टेकर,अशोक दहीफळे, भाऊ बोरुडे, भगवान फुलसौंदर आदींसह तालुका प्रमुख व अन्य पदाधिकारी होते.

अनिल शिंदे व बाळासाहेब बोराटे हे बाहेरगावी असल्याचे सांगण्यात आले तर माजी आमदार (स्व.) अनिल राठोडयांचे चिरंजीव माजी नगरसेवक विक्रम राठोड हे मुंबईला युवासेनेच्या बैठकीला गेल्याचे सांगितले गेले. यावेळी उपस्थित सर्वांनी उद्धव ठाकरेंसमवेत राहण्याचा निर्धार व्यक्त केला. दरम्यान, जिल्हा शिवसेनेने ठाकरेंच्या समर्थनाथ र्घेतलेल्या मेळाव्यात बंडखोर आमदारांचे प्रतिकात्मक पुतळे जाळताना त्यात संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांचीही प्रतिमा टाकली होती. मेळाव्यातहीकोरगावकरांकडून त्रास होत असल्याच्या भावनाही व्यक्त झाल्या होत्या या पार्श्वभूमीवरकोरगावकरांनी मंगळवारी घेतलेल्या बैठकीत काहींचा कोरगावकर यांच्याशी वाद झाला व त्यांनी कोरगावकरांकडे राजीनामाही मागितल्याचे ही समजते. मात्र, त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

............

..................

दुसरीकडेही सुरू होती बैठक

संपर्क प्रमुख कोरगावकरांच्या बैठकीच्यावेळीच शहरातील एका हॉटेलात शहर शिवसेनेच्या काही आजी-माजी पदाधिकार्‍यांची व आजी-माजी नगरसेवकांचीही बैठक झाली. या बैठकीला माजी शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक अनिल शिंदे, माजी नगरसेवक अनिल लोखंडे, सचिन जाधव, नगरसेवक मदन आढाव, सुभाष लोंढे आदींसह अन्य काहीजण होते. राज्यस्तरीय शिवसेनेच्या फुटीवर आज बुधवारी (20 जुलै) न्यायालयीन सुनावणी होणार आहे. या सुनावणीतील निर्णयानंतर आज सायंकाळी आपला निर्णय आपण घेऊ, असे यावेळी बैठकीत ठरवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

सर्वजण पक्षाबरोबरच - कोरगावकर

बैठकीनंतर कोरगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.ते म्हणाले, बैठकीला 16 ते 17 नगरसेवक उपस्थित होते. अनुपस्थित नगरसेवकांपैकी अनेकांशी माझी चर्चा झाली आहे. सर्वजण पक्षाबरोबरच आहेत, असे आवर्जून स्पष्ट करून ते म्हणाले, काहींच्या इच्छा पूर्ण न झाल्यास ते नाराज होतात. काही ठराविक जण माझ्या विरोधात आरोप करीत आहेत. त्यांनी माझा राष्ट्रवादीशी संबंध दाखवल्यास मी संपर्कप्रमुख पदही सोडेन, अशा शब्दात त्यांनी आव्हान दिले. नगर शहरातील पदाधिकारी व नगरसेवकांची बैठक घेतली आहे. सर्वजण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहेत. वरिष्ठ पातळीवर कायदेशीर लढाई सुरू आहे. याची नगरसेवक व पदाधिकार्‍यांना माहिती दिली आहे. या संदर्भात प्रतिज्ञापत्राचा फॉरमॅटही देण्यात आलेला आहे. मध्यंतरी काही नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून आले. त्यांच्याशीही माझी चर्चा झाली आहे. त्यांच्यावर शिंदे यांचे खूप उपकार आहेत, त्यामुळे ते त्यांना भेटले, मात्र ते उद्धव ठाकरे यांच्या समवेतच आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले असल्याचे कोरगावकर यांनी सांगितले.पक्षात अनेकांना काही अपेक्षा असतात. काहींच्या इच्छा-अपेक्षा पूर्ण झाल्या नसल्याने ते माझ्यावर आरोप करीत असतील. आरोप करणारे काही ठराविकच आहेत. राष्ट्रवादीशी माझा कुठलाही संबंध नाही. राष्ट्रवादीशी माझा संबंध दाखवून दिल्यास मी संपर्कप्रमुख पदही सोडायला तयार आहे, असेही कोरगावकर यावेळी म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com