स्थानिक शिवसेना संयमाच्या मोडवर

मातोश्रीच्या आदेशानुसारच पुढील पाऊल
स्थानिक शिवसेना संयमाच्या मोडवर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरात स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार शिवसेना उपनेते स्व. अनिल राठोड यांनी शिवसेना रूजवली आहे. नगरचे सर्व शिवसैनिक, पदाधिकारी, नगरसेवक हे कायम पक्षाच्या व मातोश्रीच्या आदेशानुसारच भूमिका घेतात. राज्यात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवर पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निर्णय घेतील. तोपर्यंत शिवसैनिकांनी संयम बाळगावा, अशी भूमिका शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांनी जाहीर केली आहे.

सध्याच्या निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत शिवसैनिकांनी एकत्र रहाणे आवश्यक आहे. पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी साथ देणे, ही सर्व शिवसैनिकांची, आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ नगरमध्ये फलक लावले आहेत. ‘काळ कसोटीचा आहे.. पण संघर्ष आम्हाला नवीन नाही.. आता पुन्हा लढायचंय.. आम्ही शिवसेनेसोबत आम्ही उद्धव ठाकरेंसोबत..’ अशा आशयाचा फलक जाधव यांनी लावला आहे.

एक नगरसेवक शिंदे गटात

महानगरपालिकेतील शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक मदन आढाव यांनी सेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. आढाव यांचा यासंदर्भातला व्हिडिओ व्हायरल झाला असून यात त्यांनी शिवसेनेचे नगरचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांच्यावर टीका केली आहे. कोरगावकर यांनी नगर शहर शिवसेनेची वाट लावल्याचा आरोप आढाव यांनी केला आहे. कोरगावकर यांच्यासारख्या बडव्यांपासून उद्धव ठाकरे यांनी सावध राहावे, असेही आढाव यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com