नगर शहरात शिवजयंतीची जय्यत तयारी

मिरवणूक ठरणार लक्षवेधी || शिवसेना, भाजपकडून स्वतंत्र मिरवणुका
नगर शहरात शिवजयंतीची जय्यत तयारी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्यामुळे यंदा तिथीप्रमाणे होत असलेल्या शिवजयंतीसाठी नगर शहर शिवसेनेच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. भाजपाच्यावतीनेही सार्वजनिक मिरवणुकीचे स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. सुमारे नऊ सार्वजनिक मंडळांकडून शिवजयंती साजरी केली जाणार आहे.

दरम्यान शासनाने लागू केलेल्या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना नगर शहर पोलिसांकडून शिवजयंती साजरी करणार्‍या मंडळास देण्यात आल्या आहेत. मिरवणुकीला परवानगी नाकरण्यात आली आहे. रात्री 12 वाजेपर्यंत एका जागेवर स्पीकर वाजवून शिवजयंती साजरी करण्याची परवानगी शहर पोलिसांनी दिली असल्याचे शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे यांनी सांगितले. कलम 149 नुसार मंडळास नोटिसा देण्यात आल्या आहेत. परंतु पोलिसांचा आदेश न जुमानता शिवजयंती मिरवणूक काढण्याची तयारी मंडळाने केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे होत असलेल्या शिवजयंतीसाठी नगर शहर शिवसेनेच्यावतीने मिरवणुकीत पारंपरिक देखाव्यांसह प्रत्येक चौका-चौकात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. नगर शहर व उपनगरातील केडगाव, भिंगार, सावेडी आदी ठिकाणीही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांनी दिली. शहरातून निघणार्‍या मुख्य मिरवणुकीस आज (सोमवार) दुपारी 3 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून प्रारंभ होणार आहे.

भाजपाच्यावतीने शिवजयंती मिरवणुकीचे नियोजन करण्यात आले आहे. आज दुपारी 4 वाजेपासून शिवछत्रपती पुतळ्या पासून मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. या मिरवणुकीत विशेष आकर्षण छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती तसेच मावळ्यांच्या वेशभूषेतील घोडेस्वार, बाल कलाकार, पारंपरिक पोषाख केलेल्या महिला, काठी पथक, बांगडी वाद्य पथक आदी सहभागी असणार आहेत, अशी माहिती भाजप शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी दिली.

पोलिसांचा चोख बंदोबस्त

यंदा करोनाचे संकट नसल्यामुळे तिथीनुसार होणार्‍या शिवजयंतीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. नगर शहर पोलिसांनीही चोख बंदोबस्त तैनात केला आहे. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी शहरातून रूटमार्च काढण्यात आला. यावेळी कोतवाली, भिंगार, तोफखाना, शहर वाहतूक शाखेचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. आज ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात केला आहे. यामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक 1, पोलीस उपअधीक्षक 1, पोलीस निरीक्षक 6, सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक 17, पोलीस कर्मचारी 310, होमगार्ड 100, राज्य राखीव दलाची एक तुकडी असा बंदोबस्त असणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com