कापडबाजार
कापडबाजार
सार्वमत

बफर झोनमधून कापडबाजार वगळा; व्यापारी आक्रमक

शिवसेनेच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ भेटले महापालिका आयुक्तांना

Arvind Arkhade

अहमदनगर (प्रतिनिधी) - शहरातील एम. जी. रोड व कापडबाजाराचा समावेश बफर झोनमध्ये केल्याने व्यापार्‍यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. बफर झोनबाबत शासन परिपत्रकामध्ये कोठेही उल्लेख नसल्यामुळे तो रद्द करण्यात यावा किंवा एम. जी. रोड व कापड बाजार बाजारपेठेचे क्षेत्र त्यातून वगळावे, अशी मागणी व्यापार्‍यांनी केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी दिले.

शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली व्यापार्‍यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी आयुक्त मायकलवार यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली. यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर, भगवान फुलसौंदर, शहरप्रमुख दिलीप सातपुते, बाळासाहेब बोराटे, योगीराज गाडे, दत्ता जाधव, गिरीश जाधव, आनंद लहामगे, विक्रम राठोड, किरण वोरा, श्यामराव देडगावकर, हरीश मध्यान, महेश मध्यान, नरेंद्र गोयल, विजय चोपडा, प्रकाश बायड, डी. के. येवलेकर, मनीष गुगळे, मयूर जामगावकर, परेश लोखंडे, संतोष गेनाप्पा आदी उपस्थित होते.

एम. जी. रोड व कापडबाजार व्यापारी असोसिएशनने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की कोविड-19 महामारीमुळे लॉकडाऊन व संचारबंदी असल्याने आमची दुकाने मार्च 2020 पासून 67 दिवस सलग बंद होती. ती नुकतीच उघडली होती. बाजारपेठेची परिस्थिती पूर्ववत येण्यापूर्वीच पुन्हा तो भाग बफर झोनमध्ये टाकून बंद करण्यात आला.

वास्तविक बाधित रुग्ण जेथे आढळतात तेथे कंटेन्मेंट झोन जाहीर केला जातो. कंटेन्मेंट झोनच्या लगतचा मोठा परिसर बफर झोनमध्ये टाकला जात असल्याने व्यापारी, त्यांच्यावर अवलंबून असणारे कर्मचारी व नागरिकांना त्रास आणि भुर्दंड सोसावा लागतो. यामुळे व्यापार्‍यांना मालाची देणी, बँकेची व इतर खासगी देणी देणे, कर्मचार्‍यांचे पगार करणेही दुरापास्त झाले आहे. त्यामुळे हा भाग बफर झोनमधून एम. जी. रोड व कापड बाजार परिसर वगळवा, अशी मागणी असोसिएशनने केली आहे.

लॉकडाऊन-4 व अनलॉक-1 च्या अधिकृत आदेशामध्ये बफर झोनचा उल्लेख नाही. शासनाच्या आदेशात बदल करता येत नाही. महाराष्ट्र कंटेन्मेंट झोन केवळ मर्यादित स्वरूपात असतो. नगरमध्येच बफर झोन घोषित. बफर झोनमुळे संभ्रम. व्यापारी, गरीब, मजूर, कष्टकरी यांचे मोठे नुकसान. नगर शहराचा गावठाण भाग अत्यंत मर्यादित आहे. बफर झोनमुळे नगर शहराची अनलॉकऐवजी लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल होईल.

Deshdoot
www.deshdoot.com