अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील शेरकर गल्लीत अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांच्या पथकाने गुटखा असलेल्या गोदामावर छापा टाकला होता.

या छाप्यात 13 लाख 92 हजार 729 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी अन्न औषध विभागाच्यावतीने दिलेल्या फिर्यादीनुसार शुभम रमणलाल भळगट (वय 24 रा. शेरकर गल्ली, नगर) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

राज्यात गुटखा बंदी असताना जिल्ह्यात गुटखा विक्री मोठ्या जोमाने सुरू आहे. शहरासह जिल्ह्यातील पानटपर्या, किराणा दुकानात गुटखा सहज उपलब्ध होत आहे, असे असून देखील गुटख्यावर कारवाई केली जात नव्हती.

परंतु, श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे येथील गुटखा कारवाई नंतर नगर शहरातील गुटखा गोदामावर पोलिसांनी छापा टाकला आहे. चितळे रोडवर बेकायदा गुटखा विक्री होत असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक डॉ. राठोड यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक एस. एच. सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नियुक्त करून कारवाईच्या सूचना दिल्या.

उपनिरीक्षक सूर्यवंशी यांच्या पथकाने शेरकर गल्लीतील भळगट याच्या घरी छापा टाकला. यावेळी मोठ्याप्रमाणात गुटखा मिळून आला. यामध्ये हिरापान मसाला, सुगंधी तंबाखू, गोवा, राजश्री पान मसाला आदी गुटख्याची पाकीटे मिळून आली. सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून तोफखाना पोलीस ठाण्यात आणला.

त्याठिकाणी रात्रभर गुटख्याची मोजदाद सुरू होती. याप्रकरणाची माहिती अन्न व औषध प्रशासनाला देण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी शदर पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भळगट विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुटख्यावर कारवाई माव्याचे काय ?

नगर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दररोज लाखो रुपयांची मावा विक्री सुरू आहे. हा मावा तयार करण्यासाठी सुंगधी तंबाखूचा वापर करण्यात येतो. नगरमध्ये माव्याची प्रसिध्द ठिकाणे असून काही ठिकाणी तर दररोज दहा ते 15 जण मावा तयार करण्यासाठी रोजंदारीवर कामाला आहेत. पोलीस गुटख्यानंतर माव्याकडे लक्ष देणार का? असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे.