नगरमध्ये सर्वत्र कचर्‍याचे ढीग

उपमहापौर भोसले || आठ दिवसांत नियोजन करा अन्यथा कारवाई करणार
नगरमध्ये सर्वत्र कचर्‍याचे ढीग

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर शहरांमध्ये ठिकठिकाणी कचर्‍याचे ढीग दिसत आहेत. त्यामुळे सर्वत्र अस्वच्छता निर्माण झाली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होत आहे. सध्या शहरामध्ये साथीच्या आजाराचे प्रमाणही वाढत आहे. मनपा घनकचरा विभाग व कचरा संकलन ठेकेदाराने संयुक्तपणे नियोजन करून शहरातील कचर्‍याचे ढीग येत्या आठ दिवसांमध्ये उचलावे त्यानंतर जर कचर्‍याचे ढीग दिसल्यास अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा उपमहापौर गणेश भोसले यांनी दिला.

शहरातील घंटागाडीचे नियोजन करून घरोघरी वेळेवर जाणे गरजेचे आहे. जेणेकरून शहरातील शंभर टक्के कचरा संकलन केला गेला पाहिजे. नगर शहराने भारत स्वच्छ अभियानामध्ये भाग घेतला आहे. जे कोणी नागरिक साफसफाई केल्यानंतर रस्त्यावर कचरा आणून टाकेन त्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी. ज्या ठिकाणी कचरा दिसेल त्या ठिकाणचे फोटो काढून मी स्वतः पाठवीन व त्याला जबाबदार असणार्‍यांवर कारवाई केली जाईल.

मुकादम व स्वच्छता निरीक्षक यांना कचर्‍याच्या ढीगाची माहिती असल्यामुळे त्यांनी ती यादी कचरा ठेकेदाराकडे द्यावी. सर्वांनी टीमवर्क म्हणून काम करावे जबाबदारीने सर्वांनी काम केल्यास कचर्‍याचे ढीग पडणार नाही आणि आपले शहर स्वच्छ व सुंदर राहील अशी सूचना घनकचरा विभागाच्या बैठकीत उपमहापौर भोसले यांनी दिल्या. स्वच्छतेबाबत घनकचरा विभागाची बैठक उपमहापौर भोसले यांनी घेतली. यावेळी स्थायी समितीचे सभापती कुमारसिंह वाकळे, नगरसेवक गणेश कवडे, घनकचरा विभाग प्रमुख डॉ. शंकर शेडाळे, स्वच्छता निरीक्षक किशोर देशमुख व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com