2023.. नगरकरांना फ्लायओव्हरची भेट

2023.. नगरकरांना फ्लायओव्हरची भेट

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

एक तप काळात दोन-तीनदा भूमिपूजन आणि मातीपरिक्षणानंतर थांबलेले काम... त्यामुळे आज होणार.. उद्या होणार.. कधी होणार... उड्डाणपुलाबाबतचा हा उपरोधिक सवाल करणार्‍यांची तोंडे आता गप्पगार होण्याच्या मार्गावर आहेत.

नगरमधील बहुचर्चित उड्डाणपुल उभारणीसाठी पाया खोदणी सुरू असून पिलर उभारणीचे कामही सुरू झाले आहे. 2023 मधील नव्या दिवसाची सुरूवात या पुलावरून होणार आहे. तशी तंबीच ठेकेदार संस्थेला नॅशनल हायवे अ‍ॅथोरिटीने दिली आहे.

नगर शहरातून जाणार्‍या पुणे-औरंगाबाद आणि मनमाड हायवेवरील अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी नित्याची बाब झाली. उड्डाणपूल हाच त्यावर एकमेव उपाय होता. पण अनेक अडथळे आले अन् गत दहा वर्षापासून पुलाचा विषय नगरकरांसाठी चेष्ठेचा झाला.

माजी खासदार दिलीप गांधी यांच्या पुढाकारातून पुलाचे काम केंद्रीय महामार्ग विभागाकडे गेले. भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे महाराष्ट्रातील असल्याने त्यांनी या कामासाठी सुमारे अडीचशे कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला. पुलाच्या कामाचे टेंडर देण्याची प्रक्रिया सुरू झाली अन् लोकसभेची निवडणूक लागली. त्यामुळे थांबलेली प्रक्रिया निवडणुकीनंतर पूर्ण झाली.

दरम्यानच्या काळात गांधींचा पत्ता कट झाला अन् डॉ. सुजय विखे खासदार झाले. डॉ. विखे यांनी उड्डाणपुलाच्या कामासाठी पाठपुरावा सुरू केला. मिलिटरीची जमिन पुलासाठी संपादीत करावी लागणार होती. त्याचे अडथळे त्यांनी दूर केले. दिल्ली दरबारी वजन वापरून पुलाचे टेंडर प्रक्रिया पूर्ण करून घेतली. गुजरातच्या कंपनीला हा उड्डाणपुल उभारणीचा ठेका मिळाला आहे. कंपनीने महिनाभरात पाया खोदून पुलासाठी पिलर उभारणी सुरू केली आहे.

दोन वर्षाची मुदत

नगरमधील उड्डाणपूल उभारणीसाठी ठेकेदाराला दोन वर्षाची मुदत देण्यात आली आहे. तशी अटच टेंडरमध्ये टाकण्यात आली आहे. डिसेंबर 2020 मध्ये ठेकेदाराला वर्क ऑर्डर देण्यात आली. दोन वर्षे म्हणजे 2022 च्या डिसेंबरमध्ये त्याची मुदत संपणार आहे. 2023 मधील पहिल्याच दिवशी हा पुल पूर्ण झालेला असेल. म्हणजे 2023 नव्या वर्षात नगरकरांना नवा देखणा उड्डाणपूल पहावयास मिळणार आहे.

सोलापूर चौक वगळता स्टार्ट टू एन्ड

यश पॅलेस चौकातील मळगंगा देवी मंदिर ते सरोष पाण्याची टाकीपर्यंत 3.8 किलोमीटर लांबीचा हा पुल असणार आहे. सोलापूर हायवेवर उतरण्यासाठी उड्डाणपुल खाली उतरविला जाणार आहे. तेथून पुलावर चढल्यानंतर थेट यश पॅलेस चौकातच शेवट असणार आहे. नगर बसस्थानकाजवळही पुलावर चढ-उतार करता येणार नाही.

उड्डाणपुलासाठी पाया खोदणी सुरू असून पिलरही उभे राहत आहे. डिसेंबरमध्ये वर्क ऑर्डर दिली. कामाचा वेग पाहता काम मुदतीत पूर्ण होईल. 248 कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे.

- प्रफुल्ल दिवान उपकार्यकारी अभियंता, नॅशनल हायवे अ‍ॅथॉरीटी

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com