
अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar
नगर शहरातील करोनाग्रस्तांची संख्या आता गुणाकार पध्दतीने वाढण्यास सुरूवात झाली आहे. करोनामुक्त, तसेच त्यांच्या संपर्कातील तब्बल 3 हजार 210 नगरकरांना प्रशासनाने होम क्वारंटाईन करून ठेवले आहे. शहरात बाधितांचा आकडा अडिच हजारांच्या घरात पोहचला असून त्यातील साडेतीनशे बाधित विविध हॉस्पिटलमध्ये करोना उपचार घेत आहेत.
करोनाचा कहर जिल्हाभरात सुरू असून विशेष करून नगर शहराचा आकडा त्यात मोठा आहे. जिल्ह्याने आठ हजारांचा आकडा ओलांडला असताना नगर शहर तो अडिच हजारांच्या घरात पोहचला. शहरातील 2 हजार 329 जणांना करोनाची बाधा झाली आहे. त्यातील 360 बाधित उपचार घेत आहेत. तर 44 जणांचा मृत्यू झाला आहे.
महापालिकेने 6 हजार 697 संशयितांची तपासणी केली. या तपासणीत 2 हजार 329 जणांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले. करोनातून बरे झालेले आणि करोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्यांचे ट्रेसिंग महापालिकेने केले आहे. या दोघांसोबतच लक्षणे असलेले असे एकूण 3 हजार 210 नगरकर महापालिकेच्या आरोग्य विभागाने शोधले. त्या सगळ्यांना सात दिवसांसाठी घरातच क्वारंटाईन करून ठेवण्यात आले आहे.
मृतांचा आकडा 44
नगर शहरात करोनामुळे मृत झालेल्यांचा आकडा 44 वर पोहोचला आहे. करोनाने जिल्हाभरात आतापर्यंत 94 जणांचा बळी घेतला आहे. यात सर्वाधिक बळी नगर शहरातील आहेत. करोनाबाधित उपचारानंतर ठणठणीत होण्याचा रेशोही आता घसरला आहे. गत आठवड्यात 70 टक्के असलेला हा रेशो आता 61 टक्क्यांवर आला आहे. सिव्हील हॉस्पिटलमधील लॅब, अँटीजेन टेस्ट आणि खासगी लॅबमधील रिपोर्टमुळे पॉझिटिव्हचा रेशो वाढला आहे.