चाकूचा धाक दाखवून वाहन चालकाला लुटले

नगर बायपासवरील घटना, तिघांविरोधात गुन्हा
चाकूचा धाक दाखवून वाहन चालकाला लुटले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

वाहन चालकाला चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील 15 हजार 800 रुपयांची रोख रक्कम लुटली. नगर बायपास रोडवरील समाधान हॉटेलसमोर सोमवारी पहाटे साडेपाच वाजता ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात तिघांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहन चालक ईश्वर दत्तात्रय गोसावी (वय 31 रा. देवळाली ता. करमाळा जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.

ईश्वर गोसावी व त्यांचे मित्र परशुराम शिंदे हे दोघे त्यांच्या पिकअपने (एमएच 4 एएफ 5298) सुरतवरून करमाळ्याला जात असताना नगर बायपास रोडवरील समाधान हॉटेलजवळ दुचाकीवरून आलेल्या तीन लुटारूंनी त्यांना थांबविले. त्यांना चाकूचा धाक दाखवून शिंदे यांच्या खिशातील 15 हजार 800 रूपयांची रोकड काढून घेत धूम ठोकली. गोसावी व शिंदे यांनी तोफखाना पोलीस गाठून फिर्याद दाखल केली आहे.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके करीत आहेत. दरम्यान याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी समांतर तपास सुरू केला आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात भेट देऊन माहिती घेतली आहे.

Related Stories

No stories found.