
अहमदनगर|Ahmedagar
चार दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवून दोन ट्रक चालकांकडील 18 हजार 500 रूपयांची रक्कम लुटली. नगर- औरंगाबाद रोडवरील सनी पॅलेस समोर रविवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास ही घटना घडली.
या प्रकरणी ज्ञानोबा लक्ष्मण मुंढे (वय- 35 रा. खोडवा सावरगाव ता. परळी जि. बीड) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे, तोफखान्याचे निरीक्षक सुनील गायकवाड यांनी सकाळी घटनास्थळी भेट दिली.
ज्ञानोबा मुंढे व त्यांचे मित्र माधव अच्युत होबंळे (रा. हेळंब ता. परळी जि. बीड) हे दोघे जण शनिवारी रात्री नगर- औरंगाबाद रोडवरील सनी पॅलेसमोर त्यांच्या ताब्यातील दोन ट्रका (क्र. एमएच- 46 एएफ- 9245 व क्र. एमएच- 46 बीबी- 7724) लावुन काचा बंद करून आपआपल्या ट्रकमध्ये झोपले होते. रविवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास चार दरोडेखोर ट्रक जवळ आले. त्यांनी दोन्ही ट्रकच्या काचा फोडल्या व ज्ञानोबा मुंढे आणि त्यांचा मित्र माधव होबंळे यांच्या गळ्याला चाकू सारखे धारदार शस्त्र लावून 18 हजार 500 रूपयांची रोकड काढून घेतली. यानंतर दरोडेखोर्यांनी पळ काढला. घटनेची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक किरण सुरसे करीत आहे.