700 प्रवासी क्षमता असणार्‍या रेल्वेत दररोज अवघे चार प्रवासी

नगर-आष्टी रेल्वे : जागरूक नागरिक मंचाने केला निषेध
File Photo
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर-बीड-परळी रेल्वे मार्गातील बहुचर्चित आष्टी-नगर डेमू रेल्वे आठवडाभरापूर्वी सुरू झाली. पण ही रेल्वे सेवा आता न परवडणारी ठरू पाहत आहे. 700 प्रवासी क्षमतेच्या या रेल्वेने रोज केवळ चारच प्रवासी प्रवास करतात व प्रत्येकी 40 रुपये तिकीट दराप्रमाणे फक्त 160 रुपये रेल्वेला मिळतात आणि दुसरीकडे या रेल्वेच्या एका फेरीसाठी तब्बल चार लाख रुपये खर्च होत आहेत. पुणे-नगर शटल रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणारे जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष डॉ. सुहासभाई मुळे यांनी आष्टी-नगर रेल्वे सेवेच्या मागील सात दिवसांची माहिती घेतल्यावर ही रेल्वेसेवा पांढरा हत्ती ठरण्याची भीती व्यक्त केली आहे.

या रेल्वेसेवेबाबत डॉ. मुळे म्हणाले, मराठवाड्याची भाग्यविधाती व बड्या नेत्यांचे बडे स्वप्न अशा जाहिराती आष्टी-नगर या रेल्वेच्या होत्या. नगरकरांच्या गेल्या दहा वर्षांपासून प्रचंड प्रवासी संख्येने मागणी असलेल्या नगर-पुणे शटल सर्व्हिस या मागणीकडे अक्षम्य दुर्लक्ष करून, जी आष्टी-नगर डेमु रेल्वे विद्वान रेल्वे मंत्रालयाने 23 सप्टेंबरला सुरू केली आहे, तिचे आर्थिक गणित सर्वांचेच डोळे पांढरे करणारे आहे. ही डेमु रेल्वे सुरू होऊन एक आठवडा झाला आहे.

याबाबत नगर रेल्वे स्टेशनवरील तिकीट बुकिंग सुप्रीटेंडेंट उमेश प्रसाद यांना भेटून मागील चार दिवसांमध्ये नगर-आष्टी व आष्टी-नगर रेल्वेची किती तिकिटे विकली गेली, याची माहिती मिळवली असता धक्कादायक गोष्ट समोर आली व ती म्हणजे मागील सातही दिवस आष्टी-नगर व नगर-आष्टी मिळून रोज तीन किंवा चार तिकिटांपेक्षा जास्त तिकिटे खपलेली नाहीत. या 700 प्रवासी क्षमता असलेल्या गाडीने रोज फक्त तीन किंवा चार लोकांनी प्रवास केला आहे. नगर-आष्टी चे तिकीट 40 रुपये असून रेल्वेला त्यातून दररोज फक्त 160 रुपये व मागील सात दिवसांत अंदाजे 1 हजार 200 रुपये उत्पन्न मिळाले आहेत, असा दावा त्यांनी केला.

रोज चार लाखांचा खर्च

रेल्वेच्या डिझेल इंजिनाची किंमत बारा कोटी रुपये आहे आणि प्रत्येक डब्याची किंमत 45 लाख रुपये आहे. म्हणजे ही डेमु रेल्वे साडे सोळाकोटी रुपयांची आहे. शिवाय नगर-आष्टी रेल्वे मार्गासाठी साडे नऊ हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. नगरहून आष्टीला जायला या रेल्वेला 425 लिटर डिझेल लागते आहे. म्हणजे अंदाजे 42 हजार रुपयांचे डिझेल जायला आणि तेवढेच यायला लागते. शिवाय गार्ड आणि ड्रायव्हर आणि इतर स्टेशननेटवर्क यांचा सुमारे 20 हजार रुपये दिवसाचा खर्च आहे. म्हणजे कोट्यवधी रुपयाची रेल्वे आणि कोट्यवधी रुपयाचा रेल्वे मार्ग याचा खर्च, व्याज, वगैरे थोडेबाजूला जरी ठेवले, तरी दररोज केवळ तीन-चार प्रवासी नेण्यासाठी आणि आणण्यासाठी ही 700 प्रवासी क्षमता असलेली रेल्वे मागील आठवड्यापासून दररोज तब्बल चार लाख रुपये खर्च करीत आहे. म्हणजे मागील आठवड्यात आतापर्यंत 28 लाख रुपयांचा धूर निघालेला आहे आणि त्यापोटी रेल्वेला आजपर्यंत फक्त 1 हजार 200 रुपये मिळाले आहेत, असे डॉ. मुळे यांचे म्हणणे आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com