नगर-आष्टी रेल्वे सेवा होणार सुरू

23 सप्टेंबरचा मुहूर्त || नगरच्या रेल्वे स्थानकालाही मिळणार जंक्शनचा दर्जा
नगर-आष्टी रेल्वे सेवा होणार सुरू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अनेकवेळा सुरू होणार होणार अशी चर्चा होऊन ऐनवेळी हुलकावणी देणार्‍या नगर-आष्टी रेल्वे सेवेला आता 23 सप्टेंबरचा मुहूर्त लाभत आहे. रेल्वे प्रशासनाकडून या लोकार्पण सोहळ्याची तयारी सुरू आहे. यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयातील मुंबई व अन्य जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी नगर-आष्टी रेल्वे सेवेच्या पूर्वतयारीची माहिती घेत आहेत.

दुसरीकडे नगर रेल्वे स्थानकाचे नावही बदलणार असून आता नगरच्या रेल्वे स्टेशनला नगर जंक्शन असे संबोधण्यात येणार आहे. ज्या रेल्वे स्थानकातून तीन किंवा तीन पेक्षा अधिक रेल्वे जात व येत असतील, अशा रेल्वे स्थानकाला भारतीय रेल्वेच्या नियमप्रमाणे जंक्शनचा दर्जा प्राप्त होतो. नगर-आष्टी या नव्या रेल्वेसेवेमुळे नगरचे रेल्वे स्थानक 23 सप्टेंबरपासून अहमदनगर जंक्शन होणार आहे. नगरचे रेल्वे स्टेशन (मध्य विभाग) अर्थात सोलापूर विभागाच्या अंतर्गत येते. हे रेल्वे स्थानक सर्वात जुने रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जाते.

या रेल्वे स्थानकात दररोज मोठ्या संख्येने प्रवासी रेल्वेने विविध ठिकाणी जाण्यासाठी येतात. नगरच्या रेल्वे स्थानकात दोन लोहमार्ग असून दोन फलाट आहेत. दोन लोहमार्ग असल्यामुळे नगर रेल्वे स्थानक असे नाव आहे. मात्र आता या नावात प्रथमच बदल होणार आहे. दरम्यान, नगरच्या रेल्वे स्थानकातून महाराष्ट्रातून व अन्य राज्यातून येणार्‍या-जाणार्‍या रेल्वे गाड्या दिल्ली, जम्मू कश्मीर, गोवा या राज्यांसह पुणे, नागपूर, कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यात जातात.

प्रामुख्याने अहमदनगर रेल्वे स्थानकातून महाराष्ट्र एक्सप्रेस, झेलम एक्सप्रेस, पुणे-नागपूर गरीबरथ एक्सप्रेस, आझाद हिंद एक्सप्रेस, कर्नाटक एक्सप्रेस, गोवा एक्सप्रेस अशा रेल्वे गाड्या जातात. आता नगर-आष्टी ही रेल्वे नव्याने या स्थानकातून जाणार आहे. आता जंक्शनच्या दर्जामुळे रेल्वे कोच क्लिनींगची सुविधा नगरला मिळू शकते. 23 तारखेला आष्टीला लोकार्पण सोहळ्यानंतर दुपारी नगर रेल्वेस्थानकात इन्फेक्शन होणार असल्याचे सांगण्यात आले.

नगर, बीड ते परळीपर्यंत रेल्वे जोडल्यानंतर खर्‍याअर्थाने नगर जिल्ह्याला फायदा होणार आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यावर खर्‍याअर्थाने नगर जिल्हा दक्षिण भारताला थेट जोडला जाणार आहे. सध्या दक्षिण भारतातून येणार्‍या गाड्यांना फिरून शिर्डीपर्यंत यावे लागते. नगर, बीड ते परळी मार्गामुळे हे अंतर कमी होणार असून दक्षिण भारताकडून मुंबईला जाण्याचा वेळ हा चार ते पाच तासांनी कमी होणार असल्याचे रेल्वे जाणकारांचे म्हणणे आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com