नगर अर्बनच्या कोपरगाव, शिर्डीसह चार शाखा होणार बंद

प्रशासक मंडळाचा निर्णय : ऑगस्टपर्यंत अखेरची मुदत
नगर अर्बनच्या कोपरगाव, शिर्डीसह चार शाखा होणार बंद
File PHoto

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शतकोत्तरी आणि वैभवशाली परंपरा असलेल्या नगर अर्बन बँकेच्या चार शाखा बंद करण्याचा निर्णय प्रशासकीय मंडळाने घेतला आहे. यात कोपरगाव, शिर्डी आणि चंदननगर, दौंड यांचा समावेश आहे. ऑगस्टपर्यंत या शाखा बंद केल्या जाणार आहेत. यापूर्वी दोन आणि आता चार अशा सहा शाखा प्रशासक मंडळाने बंद केल्या आहेत.

नगर अर्बन बँकेच्या 47 शाखा प्रशासक नियुक्तीपूर्वी कार्यरत होत्या. तत्कालीन संचालकांनी बँकेचा नफा न पाहता नव्याने शाखा स्थापन करत विस्तार केला. मात्र, तो तोट्याचा असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यामुळे बँकेच्या जिल्ह्यातील कोपरगाव, शिर्डी आणि पुण्याच्या चंदननगर, दौंड या चार शाखा बंद करण्यात येणार आहेत. दोन महिन्यांपूर्वी याच प्रशासकीय मंडळाने चाकण आणि सिन्नर शाखा बंद केल्या आहेत.

प्रशासक मंडळाकडे बँकेचा कारभार गेल्यापासून तोट्याचे कारण पुढे करत सहा शाखा बंद करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती सुत्रांनी दिली. कोपरगाव, शिर्डी, दौंड आणि चंदननगर शाखा बंदचा निर्णय 21 मे रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 31 ऑगस्टपर्यंत त्या सुरू असतील. 1 सप्टेंबरला मात्र त्या शाखेला टाळे लागणार आहेत. बंद होणार्‍या शाखेतील खाते नजीकच्या शाखेत वर्ग केले जाणार असल्याचे समजते. 2012 मध्ये तत्कालीन संचालकांनी नव्याने शाखा सुरू करण्याचा निर्णय घेतला. सभासदांनी त्याला विरोध दर्शविला.

मात्र सभासदांच्या विरोधाला न जुमानता बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाने या नव्या शाखा सुरू केल्या. बँकेचा फायदा न पाहता सुरू केलेल्या या शाखा 9 वर्षांनंतर बंद करण्याची वेळ आली.

बहुतांश तोट्यात

2008 ते 2012 या काळात तत्कालीन संचालकांनी तब्बल 15 नव्या शाखा सुरू केल्या. यातील दोन-चार शाखा वगळता बाकी आजही तोट्यात आहेत. 2013 मध्ये बँकेला मल्टीस्टेटचा दर्जा मिळाला. 2019 मध्ये बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर तोट्यातील शाखा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बँकेच्या काही संचालकांनी रिर्झव्ह बँकेकडे पत्र व्यवहार करून परिस्थिती तपासूनच नव्या शाखांना परवानगी द्यावी अशी मागणी केली. त्याची दखल घेत रिर्झव्ह बँकेने नव्या शाखांची परवानगी नाकारली. बँकेचा तोटा कमी करण्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासक मंडळाने कटू निर्णय घेतला असला तरी तो योग्य आहे.

- राजेंद्र गांधी, सभासद.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com