नगरमधील बहुतांशी अजान भोंगे विना

पोलिसांच्या विनंतीला प्रतिसाद
नगरमधील बहुतांशी अजान भोंगे विना

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मशिदीवरील भोंगे उतरविण्याच्या मागणीसाठी मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 4 मे पासून मशिदीसमोर भोंगे लावून हनुमान चालीसा वाजविण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर नगरमध्ये पोलिसांनी मंगळवारी बैठक घेऊन अजानच्या वेळी भोंगे न वापरण्याची विनंती केली होती.पोलिसांच्या विनंतीला प्रतिसाद देत शहरात बहुतांश ठिकाणी भोंग्यांविना अजान पार पडली.

पोलिसांनी नगर शहरात मनसे पदाधिकार्‍यांसह अन्य अशा 100 ते 125 जणांना नोटिसा बजावल्या आहेत. दरम्यान, नगर शहर व लगतच्या परिसरातील पोलीस ठाण्यांमध्ये भोंगे लावण्यासाठी केवळ 51 अर्ज दाखल झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. भोंगे प्रकरणावरून राज्यभरात तणावाचे वातावरण आहे. नगर शहरातही या मुद्यावरून जातीय तणाव निर्माण होऊन कायदा सुव्यवस्था धोक्यात येण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने नगर शहरातील मनसेच्या 15 पदाधिकार्‍यांना नोटिसा बजावल्या आहेत. तसेच या मुद्यावरून मनसे व्यतिरिक्त इतर सामाजिक संघटना व काही सराईत गुन्हेगारांनाही पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा बजावल्या आहेत. दुसरीकडे सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार प्रार्थना स्थळांवर भोंगा व लाऊडस्पीकर लावण्यासाठी परवानगी आवश्यक आहे. राज्यभरात भोंग्यांचा मुद्दा तापल्यानंतर पोलिस ठाण्यांमध्ये परवानगीसाठी अर्ज येण्यास सुरुवात झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहर व लगतच्या परिसरातील पोलिस ठाण्यांमध्ये भोंग्याच्या परवानगीसाठी अर्ज येण्यास सुरूवात झाली आहे.

त्यामुळे बहुतांशी प्रार्थनास्थळांनी भोंग्याच्या परवानगीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. पोलिसांनी पोलिस ठाण्यामध्ये बैठका घेऊन अजान करताना भोंगे न वाजविण्याची विनंती केली होती. कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या 43 मशिदींपैकी 40 मशिदींमध्ये भोंग्यांविना अजान झाली. भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीत व तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व मशिदीवर भोंग्यांविना अजान झाली. दरम्यान, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करून जुने कोर्ट परिसरात धार्मिक कार्य म्हणून हनुमान चालीसा लावण्याकरता व पठण करण्याकरता परवानगी द्यावी, अशी मागणी मनसेच्या महिला जिल्हाध्यक्ष अनिता दिघे यांनी कोतवाली पोलीसांकडे अर्जाद्वारे केली आहे.

Related Stories

No stories found.