
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
कांदा प्रश्न मागच्या काही दिवसांपासून पेटलेला आहे. शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात कांदा खरेदीची घोषणा केली. 2 हजार 410 रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा खरेदी सुरु करण्यात आली. त्यानंतर काल नाफेडच्या कांदा खरेदी दरात घसरण झाली आहे. 125 रुपये 13 पैशांनी हे दर कमी करण्यात आले आहेत. 2 हजार 274 रुपये 83 पैसे दर जाहीर झाल्याने तीव्र संताप व्यक्त करण्ययात येत आहे.
कांद्याच्या बाजारभावात चढउतार होत असल्याने कांदा उत्पादक शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने कांदा खरेदी करण्यास सुरुवात झाली. नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आला.
2 हजार 410 रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा खरेदी करण्याची घोषणा सरकारने केली. त्यानुसार आत्तापर्यंत साडे 7 हजार टन कांदा नाफेडच्या माध्यमातून खरेदी करण्यात आला. काल अचानक नाफेडने कांद्याचे दर 125 रुपये 13 पैशांनी कमी केले आणि 2 हजार 274 रुपये 83 पैसे दराने खरेदी सुरू केली. यामुळे शेतकर्यांचं नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकर्यांमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड रोष निर्माण झाला. हा संताप शेतकर्यांनी बोलताना व्यक्त केला.
लासलगावच्या बाजारात मात्र वेगळं चित्र दिसत आहे. नाफेडपेक्षाही लासलगाव बाजार समितीमध्ये दर अधिक मिळत आहे. 625 वाहनातून 7000 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. कांद्याला जास्तीत जास्त 2 हजार 481 रुपये, सरासरी 2 हजार 351 रुपये तर कमीत कमी आठशे रुपये इतका प्रतिक्विंटला दर मिळत आहे.
नाफेडच्या घसरलेल्या दरांमुळे शेतकर्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. या संदर्भात शेतकर्यांनी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांना संपर्क केला. तसंच जिल्हाधिकार्यांशी संपर्क साधला. मात्र सकारात्मक प्रतिसाद उत्तर नसल्याने शेतकरी अधिकच आक्रमक झाले आहेत. नाफेडच्या केंद्रावर कांदा विक्री करिता आलेल्या शेतकर्यांना आपला संताप व्यक्त केला.