गृहभेटीत सापडले 2 हजार 769 करोना रुग्ण

माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षण : सर्वांची होणार करोना चाचणी
गृहभेटीत सापडले 2 हजार 769 करोना रुग्ण
कराेना

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य सरकारने मागील आठवड्यात राबवलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात 24 हजार 372 करोना संशयित रुग्ण सापडले आहेत. यातील 8 हजार 700 जणांची चाचणी केली असून त्यापैकी 2 हजार 769 करोना बाधित रुग्ण सापडले आहेत. तर अद्याप 15 हजार 675 संशयितांची चाचणी होणे बाकी आहे. यातही अनेक जण बाधित आढळण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात करोनाचा संसर्ग झाला आहे. त्याअनुषंगाने माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरात सर्व लोकांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यासाठी गावातील आरोग्य पथकाने प्रत्येक घराला भेट देऊन नागरिकांना करोना संदर्भात काही लक्षणे आहेत का याबाबत तपासणी केली. 28 एप्रिल ते 2 मे या कालावधीत हे सर्वेक्षण झाले.

यादरम्यान आरोग्य पथकाने जिल्ह्यातील 7 लाख 80 हजार घरांमध्ये भेट देऊन सुमारे 38 लाख (90 टक्के) लोकांची तपासणी केली. त्यामध्ये 98 पेक्षा जास्त ताप असणारे, 95 पेक्षा कमी ऑक्सिजन पातळी असलेले, 100 पेक्षा जास्त पल्स रेट असलेले, अंगदुखी, वास न येणे, चव न लागणे, जुलाब होणे, याशिवाय सर्दी, ताप, खोकला तसेच तीव्र श्वसन दाह अशी लक्षणे असलेली एकूण 24 हजार 372 संशयित लोक आढळले. या सर्वांना पथकाने जवळच्या कोविड सेंटरमध्ये जाऊन तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. आतापर्यंत त्यातील 8 हजार 700 जणांनी कोरोना चाचणी केली. पैकी 2 हजार 769 पॉझिटिव्ह सापडले, तर 5 हजार 928 जणांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या. यात सर्वाधिक पॉझिटिव्ह श्रीगोंद्यातील 581 रुग्णांचा समावेश आहे.

सर्दी, ताप, खोकल्याचे सर्वाधिक रुग्ण

सर्वेक्षणात आढळलेल्या एकूण 24 हजार 372 संशयितांपैकी 7 हजार 774 जणांना सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आहेत. याशिवाय 741 जणांना तीव्र श्वसन दाहची (सारी) लक्षणे आहेत.

सर्वेक्षणातील अडचणी

जिल्ह्यात हे गृहभेट सर्वेक्षण हे अंगणवाडी सेविका आणि प्राथमिक शिक्षक यांनी केलेले आहे. या सर्वेक्षणादरम्यान अनेक ठिकाणी ऑक्सि मीटर नसणे, तपास मोजण्यासाठी सदोष यंत्रचा समावेश असणे, अनेक वेळा तर केवळ अंगणवाडी सेविकांनीच हे सर्वेक्षण केले असून शिक्षकांची अनेक ठिकाणी दांडी असल्याचे समोर आले आहे. यामुळे सर्वेक्षण आणखी काळजी आणि काटेकोरपणे होण्याची गरज आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com