‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेस आरंभ

करोनाला रोखायचे : घरोघरी तपासणी मोहीम सुरू
‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेस आरंभ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या माझे कुटुंब- माझी जबाबदारी मोहिमेस मंगळवारपासून जिल्ह्यात सुरुवात करण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांच्या टाकळी खातगाव येथे या मोहिमेचा शुभारंभ झाला. याशिवाय, प्रत्येक तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर स्थानिक पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मोहिमेस सुरुवात करण्यात आली. प्रत्येक ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या पथकामार्फत या घरोघरी सर्वेक्षण मोहिमेस सुरुवात झाली.

टाकळी खातगाव येथे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा घुले, उपाध्यक्ष प्रताप शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, तहसीलदार उमेश पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मांडगे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.

करोनाला हरवण्यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. आपापल्या भागातील जे नागरिक आजारी असतील किंवा त्यांना कोणती लक्षणे जाणवत असतील तर त्यांनी तात्काळ जवळच्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये जाऊन उपचार घेतले पाहिजेत.कोणत्याही प्रकारे आजार अंगावर काढू नका. या संसर्गाची साखळी आपण सर्वांनी मिळून तोडली पाहिजे. त्यादृष्टीनेच प्रत्येकाची ही जबाबदारी आहे. या भूमिकेतून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे, असे प्रतिपादन यावेळी विविध वक्त्यांनी केले.

या मोहिमेत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सदस्य, स्वयंसेवी संस्था, नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी अध्यक्षा घुले यांनी केले. जिल्ह्यात घरोघरी जाऊन करोनादूत ही माहिती संकलित करणार आहेत तसेच तपासणी करणार आहेत.

त्यांना नागरिकांनी स्वत:हून सहकार्य केले पाहिजे. ही मोहीम सर्व नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी आहे. कोणताही नागरिक केवळ दुर्लक्षामुळे उपचारापासून वंचित राहणार नाही, याची काळजी कुटुंबातील प्रत्येक सदस्याने घेतली पाहिजे. विशेषत: ग्रामीण भागात नागरिकांनी मास्कशिवाय बाहेर पडणे थांबवले पाहिजे.

स्वच्छताविषयक सवयींचा जागर आपण पुन्हा एकदा केला पाहिजे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. जिल्ह्यातील लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेता महानगरपालिका, ग्रामीण भाग, नगरपालिका क्षेत्र आणि कॅन्टोन्मेंट क्षेत्रात आरोग्य पथकांची स्थापना करून त्यांच्याद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहीम दोन टप्प्यात होणार असून मोहिमेची पहिली फेरी 15 ते 10 ऑक्टोबर या कालावधीमध्ये होईल आणि दुसरी फेरी 14 ते 24 ऑक्टोबर या कालावधीमध्ये होईल. पहिला फेरीचा कालावधी 15 दिवसांचा असेल तर दुसर्‍या फेरीचा कालावधी 10 दिवसांचा राहणार आहे. 25 ऑक्टोबर रोजी मोहिमेचा समारोप होणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com