
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
खवय्यांच्या आवडत्या आखाड महिन्याची सांगता आज गुरूवारी 28 जुलै रोजी होत आहे. पण गुरूवारी मांसाहार करणे वर्ज्य मानले जाते. त्यामुळे अनेक खवय्यांनी आदल्या दिवशी म्हणजे काल बुधवारीच आपल्या ‘आखाडा’ची सांगता केली. हजारो किलो मटन, मासळी, चिकनवर ताव मारून खवय्यांनी गटारी अमावस्या साजरी केली.
काल सकाळपासूनच चिकन-मटण दुकानांबाहेर मांसाहारींनी गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळाले. मांसाहार खवय्ये दीप अमावस्येला गटारी अमावस्या असे संबोधतात. अमावस्येचा प्रारंभ बुधवारी 27 जुलैला रात्री झाला. गुरूवारी रात्री अमावस्येची सांगता होणार आहे. गुरूवारी मांसाहार सेवन वर्ज्य मानले जात असल्याने बुधवारी सकाळपासून नगर, श्रीरामपूर, राहुरी, संगमनेर, कोपरगाव, राहात्यासह अन्य ठिकाणी मटण, मासळी, चिकन खरेदीसाठी खवय्यांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.
जसजशी रात्र वाढत गेली तसतशी मासांहार हॉटेल्स, खानवळ, ढाबे खवय्यांनी फुलून गेले होते. काहींनी आपल्या शेतावर, फार्म हाऊस येथे भाकरी, चपाती, भात, बिर्याणी यांच्या संगतीने ‘आखाड पाटी’ साजरी केली. दोन वर्षांनंतर हॉटेल आणि धाबेचालकांना या निमित्ताने चांगली कमाई झाली.
कार्यकर्त्यांची आखाड पार्टी, भुर्डंद मात्र इच्छुक उमेदवारांना !
जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका आणि काही ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू असल्याने ही निवडणूक लढविणार्या अनेक इच्छुकांची ही गटार आमावस्या डोकेदुखी ठरली. कारण अनेक समर्थक कार्यकर्त्यांनी ‘आखाड पार्टी’ साजरी केली. पण बिल मात्र या इच्छुकांना बिनबोभाट भरावे लागले.