मुठेवाडगाव येथे आईच्या अंत्यविधीचा सोपास्कार सहा मुलींनी केला पूर्ण

श्रीरामपूर तालुक्यातील पहिलीच घटना
मुठेवाडगाव येथे आईच्या अंत्यविधीचा सोपास्कार सहा मुलींनी केला पूर्ण

माळवाडगांव |वार्ताहर| Malvadgav

अंत्यसंस्कारप्रसंगी पारंपरिक रितीरिवाजाला छेद देत महिलेने मृतात्म्यास पाणी पाजल्याच्या, अग्नी दिल्याच्या अनेक घटना घडलेल्या असताना.

मात्र पोटी सहाही मुलीच अपत्य असलेल्या आशाबाई भाऊसाहेब मुठे (वय 64) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनानंतर, समोर एकीने तिरडी धरत चौघी खांदेकरी झाल्या. सहावीने फेर्‍या मारताना घागरीला हात लावला. एका महिलेचे अंत्यविधीचे संपूर्ण सोपस्कार महिलेनेच पार पाडल्याचा प्रसंग प्रथमच श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव येथे काल पहावयास मिळाला.

मुठेवाडगाव येथील कचरू व नानासाहेब येल्याबापू मुठे यांच्या भावजयी व भाऊसाहेब येल्याबापू मुठे यांच्या पत्नी आशाबाई भाऊसाहेब मुठे यांचे रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. काल सकाळी 11 वाजता गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होत असताना ग्रामस्थांसह उपस्थित नातेवाईक चकीत झाले.

मयत आशाबाईस सहा मुली असून मीना राजेंद्र नळे हिने हातात तिरडी धरली, शालिनीताई बाळासाहेब मात्रे, रंजनाताई कैलास शिंदे, सुरेखा गणेश भुसाळ, मंगल पोपट कर्डिले, सहावी मनिषा रमेश शेळके हिने तीन फेर्‍या मारताना घागरीला हात लावला, असे विधीचे सर्व सोपस्कार महिलांनीच पूर्ण केले. अशा पध्दतीने विधी करण्याचे नियोजन सहा बहिणींनी अगोदरच केलेले असावे.

मयत महिलेचा महिलांच्या हातून संपूर्ण विधी पार पाडण्याचा मुठेवाडगाव येथील हा प्रथम घडलेला प्रसंग असावा, अशी चर्चा उपस्थितांत दिसून आली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com