मुस्लिम तरूणाकडून हिंदू आजीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

समीर शेखचा समाजापुढे नवा आदर्श
मुस्लिम तरूणाकडून हिंदू आजीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

पवित्र रमजान महिन्यांचा कडक रोजा (उपवास) असतांनाही शेवगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते समीर शेख यांनी करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या एका हिंदुधर्मीय आजीच्या पार्थिवाला मुखाग्नि देऊन समाजापुढे नवा आदर्श उभा केला आहे. जाती-धर्माच्या भिंती छेदून दोन दिवसापूर्वी समीरने केलेल्या या अद्वितीय कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

करोनाचा संसर्ग झालेल्या एका 75 वर्षीय आजीने मंगळवारी शेवगावच्या एका खाजगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांचा शिक्षक मुलगा व सून हे दोघेही करोना पॉझिटिव्ह असल्याने उभय दांपत्य रुग्णालयात उपचार घेत आहे. जवळच्या नातेवाईकांनी अंत्यविधीसाठी पाठ फिरवल्याने 17 वर्षीय नातीची आजीच्या अंत्यसंस्कारासाठी धावपळ सुरू होती. तिची ही धावपळ, लगबग समीर शेखला स्वस्थ बसू देईना. त्याने तिला मदतीचा हात देत सरण रचण्यापासून ते मुखाग्नि देईपर्यंतचे सर्व सोपस्कार पार पाडले.

राख सावडणीसाठीही त्याने आपले हात पुढे केले. शेख हे सध्या लोकनेते मारुतराव घुले पाटील कोविड सेंटरमध्ये रुग्णाची मनोभावे सेवा करत आहेत. त्यांचे हे कार्य हिंदू-मुस्लिम धर्मीयांमध्ये जातीय तेढ निर्माण करणार्‍यांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com