माहेगाव |वार्ताहर| Mahegav

मुसळवाडीसह नऊ गावच्या पाणी योजनेकडे राहुरी तालुक्यातील नेत्यांसह जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागानेही दुर्लक्ष केले आहे.

या योजनेतून दूषित पाणी पिण्याची नामुष्की ग्रामस्थांवर ओढवली असून स्वच्छ पाणी असल्याचा जिल्हा परिषदेच्या वैद्यकीय विभागाने चुकीचा अहवाल दिल्याने 32 गावांतील या लाभार्थी नऊ गावांवर पुन्हा पुढार्यांबरोबरच अधिकार्यांकडूनही अन्याय होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मुसळवाडीसह नऊ गावच्या पाणी योजनेचे जलशुद्धीकरण यंत्र बंद असून अनेकवेळा जिल्हा परिषदेने या जलशुद्धीकरण यंत्राच्या दुरुस्तीसाठी निधी दिला. परंतु कुंपणानेच शेत खाल्ले आणि जलशुद्धीकरण यंत्र अद्यापही जैसे थे राहिले. यामुळे अनेक वर्षांपासून नऊ गावच्या ग्रामस्थांना पिवळ्या रंगाचे खराब पाणी पिण्याची वेळ आली आहे. आता राहुरी तालुक्यात मंत्री असताना सुध्दा तेच पाणी पिण्यासाठी वापरावे लागते. तालुक्यातील 32 गावे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाला जोडली गेली. या गावांना दोन्ही तालुक्यांतील नेत्यांनी सापत्नीक वागणूक दिली आहे.

मुसळवाडी पाणी योजनेत खराब पाणी असताना नुकताच जिल्हा परिषद वैद्यकीय विभागाने खराब पाणी असलेल्या पाणी योजनेचा सर्व्हे केला. त्यात मुसळवाडी योजनेचे नावच नाही. म्हणजे या योजनेचे पाणी पिण्यायोग्य असल्याचे अहवालात दाखविले असावे. गेली अनेक वर्षापासून ग्रामस्थ व मुले हे पाणी पीत असल्याने अनेकांना पोटाचे विकार झाले आहेत. यापेक्षा प्रशासनाने हे पाणी बंद केले तरी चालेल.

किमान आमच्या पोटाचे विकार तरी थांबतील, अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. ही योजना अनेक ठिकाणी लिकेज झाली असून लिकेजच्या ठिकाणी कुत्रे, जनावरे पाणी पितात. योजनेचे पाणी बंद झाले की हेच पाणी योजनेच्या पाईपमध्ये उतरते. तेच पाणी पिण्यासाठी टाकीत येते. अशा दयनीय अवस्था झालेल्या योजनेला कोणी वाली होईल का? असा सवाल उपस्थित होत आहे.

राजकारणासाठी जर तालुक्याची फाळणी झाली तर घरच्याबरोबर बाहेरचे देखील लाथाने मारतात. हे राहुरी तालुक्यातील 32 गावच्या ग्रामस्थांचे जिवंत उदाहरण आहे. 32 गावांतील शेतीचे रस्ते असून घात नसून खोळंबा, असे झाले आहे. तरी साधी विचारपूस करायला कोणी येत नाही.
- नानासाहेब पवार, माजी सरपंच खुडसरगाव