मुसळवाडी तलाव 100 टक्के भरला

मुसळवाडी तलाव 100 टक्के भरला

मुसळवाडी |वार्ताहर| Musalwadi

राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील 25 गावांना जल संजीवनी देणारा व सुमारे 189 दशलक्ष घनफूट जलसाठवण क्षमता असणारा मुसळवाडी तलाव मंगळवारी संध्याकाळी सहा वाजता पूर्ण क्षमतेने शंभर टक्के भरला असल्याची माहिती अहमदनगर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर, देवळाली प्रवरा पाटबंधारे विभागाचे उपअभियंता आर. एन. थोरे, मुसळवाडी पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी एस. बी. सुरंबकर, शाखाधिकारी जावेद सय्यद यांनी दिली.

मुसळवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. मुसळवाडी तलावाची साठवण क्षमता सुमारे 189 दशलक्ष घनफूट असून या जलाशयातून सुमारे 2000 हेक्टर शेती क्षेत्र सिंचनाखाली येत असून श्री म्हसोबा महाराज पाणी वापर संस्थेमार्फत व पाटबंधारे विभागामार्फत शेतीसाठी उत्कृष्ट पाणी व्यवस्थापन केले जाते. तसेच मुसळवाडीसह, टाकळीमिया, आरडगाव, महाडुक सेंटर, मालुंजे खुर्द, महालगाव, लाख, दरडगाव, जातप, त्रिंबकपूर, माहेगाव, खुडसरगाव, पाथरे खुर्द, शेनवडगाव, कोपरे, तिळापूर, बोरीफाटा, वांजुळपोई आदी गावांना शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी शासनाच्या योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो.

मुसळवाडी तलाव मुळा धरणातून व भंडारदरा धरणातील उजव्या कालव्याद्वारे दरवर्षी भरला जातो. पूर्वीच्या काळी मुसळवाडी तलाव निर्मितीनंतर तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी तत्कालीन शासनाने भंडारदरा धरणातील पंधरा टक्के पाणी राखीव ठेवून दरवर्षी तलाव 189 दशलक्ष घनफूट पूर्ण क्षमतेने पाटबंधारे विभागामार्फत भरला जात होता. त्यामुळे देवळाली प्रवरा, टाकळीमियासह सुमारे 25 गावांतील शेतकर्‍यांची शेती बागायती होऊन उसाचा पट्टा निर्माण झाला. परंतु निळवंडे धरण उभारणी झाल्यानंतर अलिकडच्या काळात काही राजकीय मंडळींनी गडबड केल्याने मुसळवाडी तलावात पाणी येणे बंद झाले. त्यामुळे देवळाली प्रवरा, टाकळीमियासह पंचवीस गावांतील शेती धोक्यात आली.

भंडारदरा धरणाच्या पाण्यावर त्यावेळी अनेक शेतकर्‍यांनी बारामाही ब्लॉकद्वारे पाणी मागणी करून हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणले. त्यानंतर मुसळवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरण्याची जबाबदारी मुळा धरणावर येऊन ठेपली आहे. त्यानंतर हा तलाव मुळा धरणातील पाण्याने दरवर्षी पूर्ण क्षमतेने भरला जात आहे. या तलावालगत शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून मत्स्यबीज केंद्र स्थापन केले आहे.

त्यामुळे परिसरातील आदिवासी बांधवांना मासेमारी करून रोजगार उपलब्ध झाला होता व उदरनिर्वाहाचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागला होता. मात्र हे मत्स्यबीज केंद्र तब्बल दहा ते पंधरा वर्षांपासून बंद असल्याने मत्स्य व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे तलावालगत असलेल्या भिल्ल समाजातील सुमारे 500 ते 600 आदिवासी बांधवांना उपासमारीची वेळ आली आहे. तरी शासनाने बंद पडलेले श्री. म्हसोबा महाराज मत्स्यबीज केंद्र पूर्वीप्रमाणे मत्स्यबीज सोडून सुरू करावे, अशी मागणी शासनाकडे आदिवासी बांधवांनी केली आहे.

निसर्गाच्या कृपेने यंदाही मुसळवाडी तलाव शंभर टक्के पूर्ण क्षमतेने भरल्याने सुमारे 25 गावातील शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा महत्त्वाचा प्रश्न सुटला आहे. शेतीच्या व पिण्याच्या पाण्याची चिंता मिटल्याने तलावाचे पाणी वर्षभर मिळणार असल्याने पाटबंधारे विभागाचे आभार मानून परिसरातील शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com