मुसळवाडी परिसरातील सर्वच पिकांचे सरसकट पंचनामे करण्याची मागणी

मुसळवाडी परिसरातील सर्वच पिकांचे सरसकट पंचनामे करण्याची मागणी

मुसळवाडी |वार्ताहर| Musalwadi

राहुरी तालुक्यातील मुसळवाडी परिसरातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या खरीपाच्या पिकांचे तसेच फळबागांचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांनी शासनाकडे केली आहे.

पंचक्रोशीत गेल्या काही दिवसांपासून जोरदार व सतत पाऊस होत असल्याने या भागातील सर्वच पिके पिवळी होऊन सडू लागल्याने शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. त्रिंबकपूर येथील रंगनाथ माळी, खंडू माळी, बाळासाहेब गोलवड या शेतकर्‍यांची तीन एकर कपाशी सततच्या पावसामुळे व ओढ्याच्या पाण्याने सडून गेली आहे. शेतीला तळ्याचे रूप आले आहे.

त्यामुळे त्या आदिवासी कुटुंबासह इतर अनेक शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या भागातील पिकांची पावसाने वाट लागली असून त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. एवढे मोठे प्रचंड नुकसान होऊनही शासनाच्या कृषी व महसूल विभागाने अजूनपर्यंत पंचनामे केले नाहीत. संबंधित विभागाकडे याबाबत विचारणा केली असता अजून पंचनाम्याचे आदेश आलेले नसल्यामुळे आम्ही काही करू शकत नसल्याचे सांगितले जात आहे.

शासनाच्या नियमानुसार विशिष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यानंतरच पंचनाम्याचे आदेश दिले जात असल्याचे शेतकर्‍यांना सांगितले जात आहे. त्यामुळे शासनाने पावसाचे काही निकष बदलणे गरजेचे आहे. त्यातच रोजच्या बदलणार्‍या वातावरणामुळे पिकावर मोठ्या प्रमाणात पडणार्‍या रोगांचा प्रादूर्भाव कमी करण्यासाठी शेतकर्‍यांना कृषी सेवा केंद्रातून महागडी औषधे खरेदी करावी लागत आहेत. शासनाने शेतकर्‍यांचा अंत न बघता त्वरित पंचनामे करून शेतकर्‍यांना भरीव मदत द्यावी, अशी मागणी या भागातील शेतकर्‍यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com