मुरुमाचा डंपर चालक व मालकाने पळविला

महसूल पथकाने बेलपांढरी फाटा येथे पकडला होता
मुरुमाचा डंपर चालक व मालकाने पळविला

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

गौणखनिज अवैध उत्खनन व वाहतुकीविरोधात तहसीलदार यांनी नेमलेल्या पथकाने शासनाच्या मुरुमाची चोरी करुन अवैध वाहतूक करत असताना 4 ब्रास मुरुमाचा पकडलेला डंपर चालकाने पळवून नेल्याची घटना काल गुरुवारी घडली असून याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात डंपर चालकासह मालकावर सरकारी कामात अडथळा तसेच गौण खनिज चोरी व उत्खननाबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत बेलपिंपळगावच्या तलाठी माधुरी महेश रायपेल्ली (रा. तिरुपती बालाजी सोसायटी अहमदनगर) यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, तहसीलदार यांनी अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुकीवर कारवाईसाठी पथक नेमले होते. त्यात मी तसेच नेवासा बुद्रुकच्या मंडलाधिकारी तृप्ती राजीव साळवे, नेवासा बुद्रुकचे तलाठी प्रदीप जगन्नाथ चव्हाण, सुरेगाव गंगाचे तलाठी रामेश्वर संजय गाडेकर व सुरेगाव गंगाचे कोतवाल मनोहर शिंदे यांचा समावेश आहे.

आम्ही अवैध गौणखनिज उत्खनन कारवाईसाठी नेवासा येथून बेलपिंपळगावकडे जात असताना बेलपांढरी येथील कमानीजवळ एक पिवळा-पांढरा डंपर जाताना दिसला. शंका आल्याने त्यास थांबवले. त्यात 4 ब्रास मुरुम मिळून आला. चालकाने नाव गाव सांगितले नाही. मात्र डंपरमालक लक्ष्मण नाथा पंडित रा. बहिरवाडी ता. नेवासा याचे सांगण्यावरुन मुरुम भरला असल्याचे सांगितले. सदर डंपरमध्ये कोतवाल अशोक मनोहर शिंदे यांना बसवून चालकास डंपर तहसील कार्यालयात घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर मोटारसायकलवरुन डंपर मालक आला व त्याने कोतवाल अशोक शिंदे यांचा मोबाईल हिसकावून घेतला. डंपरमधील मुरुम रस्त्यावरच खाली करुन डंपर पळवून नेला.

या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी डंपर मालक लक्ष्मण नाथा पंडीत (रा. बहिरवाडी ता. नेवासा) तसेच अनोळखी इसम या दोघांवर भारतीय दंड विधान कलम 353, 392, 379, 506, 34 तसेच पर्यावरण संक्षिण अधिनियम 1986 चे कलम 3/15 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. मोंढे करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com