
श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
सामाईक विहिरीवरील लाकूड तोडण्याच्या कारणातून झालेल्या हाणामारीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी खैदानवाडी आखोली (ता. कर्जत) येथील पाच जणांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. जी. शुक्ल यांनी 3 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
हनुमंत उर्फ काका पांडुरंग सायर, सुरेश पांडुरंग सायकर, विठाबाई पांडुरंग सायकर, स्वाती सायकर, सुवर्णा सुरेश सायकर अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. एप्रिल 2017 मध्ये घटनेच्या अगोदर मोहन सायकर व पांडुरंग सायकर (मयत आरोपी ) यांच्यामध्ये सामाईक विहिरीवरील लाकूड तोडल्याचे कारणावरून वाद झाले होते व आपआपसात मिटविण्याचे देखील ठरले होते. परंतु 24 एप्रिल 2017 रोजी रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी बाळू सायकर हे आरोपींच्या घराकडे वाद मिटविण्यासाठी जात असताना यातील आरोपी हनुमंत सायकर व सुरेश सायकर यांनी त्यांचेवर धारदार चाकूने हल्ला केला होता.
तसेच विठाबाई हिने मिरची पावडर डोळ्यावर फेकली व इतर दोघांनी लाथाबुक्क्याने मारहाण केली होती. या घटनेनंतर जखमी यांना राशिन व नंतर बारामती येथील रुग्णालयात दाखल केले होते. याबाबत बाळू निवृत्ती सायकर यांनी फिर्यादी दिली होती. सदर गुन्ह्याचा तपास पी. एस. आय ससाणे यांनी करून आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अनिल घोडके यांनी काम पाहिले.त्यांना खामकर यांनी मदत केली.