नेवासा (तालुका वार्ताहर) -

वादात असलेल्या रस्त्यावर टाकलेला मुरुम पसरवल्याच्या कारणावरुन एकास कुर्हाडीने मारहाण करुन जीवे ठार केल्याची घटना तालुक्यातील

गोधेगाव येथे मंगळवारी सायंकाळी घडली असून याबाबत मयताच्या भावाच्या फिर्यादीवरुन पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ज्ञानेश्वर लक्ष्मण ठोंबरे (वय 42) रा. गोधेगाव ता. नेवासा यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, मी वरील ठिकाणी आई, वडील, भाऊ (मयत), भावजयी, पत्नी व आमची मुले असे एकत्र कुटूंबात राहतो. आमच्या घराशेजारी महेश ऊर्फ महेंद्र गुलाबराव भिंगारदे हे त्यांचे कुटूंबासमवेत एकत्र राहतात. त्यांची व आमची शेती लगतच आहे. आमचेमध्ये शेतजमिनीच्या रस्त्यावरुन सुमारे पंधरा वर्षापासून श्रीरामपूर कोर्टात दिवाणी दावा चालू होता. त्याचा निकाल आमच्या बाजूने लागलेला आहे. 28 डिसेंबर रोजी सायंकाळी माझा मोठा भाऊ दत्तात्रय लक्ष्मण ठोंबरे हा मोटारसायकलवरुन घराकडे येत असताना महेंद्र भिंगारदे, कोमल भिंगारदे, राजेंद्र भिंगारदे यांनी भावास रस्त्यावरुन दमदाटी व शिवीगाळ केली होती. हा वाद गावातील काही व्यक्तींनी समजूत काढून मिटवला होता.

29 डिसेंबर रोजी साळंकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान महेंद्र गुलाबराव भिंगारदे याने वादात असलेल्या रस्त्यावर डम्परमध्ये मुरुम आणून टाकला. या मुरुमामुळे येण्याजाण्याकरीता अडथळा होत असल्याने मी व माझा मयत भाऊ दत्तात्रय ठोंबरे मुरुम पसरविण्याचे काम करत असताना भुपेंद्र महेंद्र भिंगारदे, अक्षय महेंद्र भिंगारदे, महेंद्र गुलाबराव भिंगारदे, कोमल धर्मराज भिंगारदे व राजेंद्र वसंतराव भिंगारदे सर्व रा. गोधेगाव ता. नेवासा यांनी गैरकायद्याची मंडळी एकत्रीत येवून हातात कुर्हाड, काठी घेवून तुम्ही हे मुरुमाचे गंज पांगू नका. हा मुरुम आम्ही टाकला आहे. असे म्हणून शिवीगाळ करुन कोमल धर्मराज भिंगारदे हिने सोबत असणार्या लोकांना यांचा कालचा माज जिरला नाही यांचा एकएकाचा काटा काढा असे म्हणाली. त्यावेळी तिचे बरोबर असलेल्या लोकांनी भाऊ दत्तात्रय यास पकडून खाली पाडून आरोपी भुपेंद्र महेंद्र भिंगारदे याने त्याचे हातातील कुर्हाडीने भाऊ दत्तात्रय याचे डोक्यात मारुन त्यास गंभीर जखमी करुन जीवे ठार मारले.

या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी वरील पाच जणांवर गुन्हा रजिस्टर फर्स्ट 978/2020 भारतीय दंड विधान कलम 302, 143, 147, 148, 149, 323, 504, 506, 341 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तापस सहायक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर करत आहेत.