कोल्हार ( वार्ताहर ) -

राहाता तालुक्यातील तिसगाववाडी येथील गौरव अनिल कडू हा तरुण लोहगाव हद्दीत जमिनीच्या वादातून डोक्यात कुदळ मारल्याने

गंभीर जखमी झाला. त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना 31 डिसेंबरला सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास घडली. यासंदर्भात लोणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे.

लोहगाव हद्दीतील गट नं. 60 (हॉटेल ग्रीनपार्क समोर) या शेतजमिनीचा वाद न्यायप्रविष्ट आहे. आरोपी अमोल दिलीप नेहे, किशोर लहानू नेहे, वसंत लहानू नेहे, सुरेश लहानू नेहे, सचिन वसंत नेहे (सर्व रा. लोहगाव) हे 31 डिसेंबर रोजी सायंकाळी शेतात होते. सदरच्या जमीनीच्या कडेला लोखंडी अॅगल रोवलेले होते व आरोपी सदरचे क्षेत्र नांगरत असल्याचे मयत गौरव कडू आणि त्याचा भाऊ किशोर यांनी चारा आणायला जाताना पाहिले. हे पाहून मयत गौरव व त्याचा भाऊ किशोर तेथे गेले असता आरोपींसोबत शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर आरोपींनी मयतास व त्याच्या भावास तंगडे तोडण्याची धमकी देऊन मारहाण करण्यास सुरुवात केली.एकाने गौरवच्या डोक्यात कुदळीचा तुंबा मारला व दोघा भावांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपींकडून झालेल्या मारहाणीत गौरव गंभीर जखमी झाला. घटनेसमयी मयत गौरवचे वडील अनिल दत्तात्रय कडू हे वैजापूर येथे नातेवाईकाच्या साखरपुड्यासाठी गेलेले होते.

त्यास उपचारासाठी तत्काळ प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्याच्या नातेवाईकांनी उपचारासाठी अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात नेले. दि. 2 जानेवारी रोजी उपचारादरम्यान गौरवचा मृत्यू झाला व त्यानंतर सिव्हिल हॉस्पीटल येथे त्याचे शवविच्छेदन करण्यात आले.

31 डिसेंबर रोजी झालेल्या मारहाणीसंदर्भात लोणी पोलीस ठाण्यात 307 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता. मात्र आता गौरवच्या मृत्यूनंतर आता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते