18 वर्षांपूर्वी आईला पळवून नेणार्‍याचा खून करून नदीत फेकले

चौघे पोलिसांच्या ताब्यात; संगमनेर तालुक्यातील घटना
18 वर्षांपूर्वी आईला पळवून नेणार्‍याचा खून करून नदीत फेकले

घारगाव |वार्ताहर| Ghargav

अठरा वर्षांपूर्वी आईला फूस लावून पळवून नेणार्‍या तिच्या प्रियकराच्या डोक्यात दगड टाकून खून केल्याचा धक्कादायक प्रकार संगमनेर तालुक्यात समोर आला आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत असून पठार भागातील चौघांना ताब्यात घेत उर्वरित आरोपींसह खून झालेल्या इसमाच्या मृतदेहाचा शोध गुरुवारी उशिरापर्यंत सुरू होता.

याबाबत समजलेली माहिती अशी की, पठार भागातील एका गावातील एका विवाहीत महिलेला तिच्याच गावातील एका विवाहीत पुरुषाने अठरा वर्षांपूर्वी पळवून नेले होते. अजूनही ती या इसमासोबत राहत आहे. याबाबतचा राग त्या महिलेच्या कुटुंबियांमध्ये होता. त्यावेळी त्या महिलेचा मुलगा लहान होता. मात्र याबाबत त्याच्या मनात फार राग होता. गेली 18 वर्षे आईच्या प्रेमास पारखा झालेल्या या मुलाने बर्‍याच वेळा त्या इसमावर नजर ठेवली होती.

बुधवारी संबंधित इसम संगमनेर न्यायालयात जाणार असल्याचे त्याला समजले. याबाबतची माहिती त्याने त्याच्या पठारभागातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मित्रांना दिली. संबंधित इसमावर पाळत ठेवण्यात आली. संबंधित इसमाला संगमनेरच्या तरुणांच्या मदतीने एका अज्ञात ठिकाणी नेवून मारहाण करण्यात आली. त्याच्या डोक्यात दगड घातल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला त्याच अवस्थेत प्रवरा नदीपात्रात फेकून देण्यात आले.

दरम्यान संबंधित इसमाच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे गुरुवारी सकाळी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात पोलिसांना 18 वषार्र्ंपूर्वीच्या महिलेस फूस लावून पळवून नेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला असता आरोपींचा सुगावा लागला. याप्रकरणी चौघांना ताब्यात घेतेले असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. मात्र प्रवरा नदीला पूर असल्याने संबंधित इसमाचा मृतदेह शोधण्याचे काम गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

या गुन्हात दहा ते अकरा आरोपींचा समावेश असल्याचा पोलिसांना संशय असून त्यांचा शोध सुरू आहे. यामध्ये संगमनेर शहरासह पठार भागातील तरुण असल्याचे बोलले जात आहे. यातील काही आरोपींनी पठार भागात गेली सहा महिन्यांपासून दहशत निर्माण केली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com