मुलानेच केला बापाचा खून

वाडेगव्हाणमधील घटना || दोन महिन्यानंतर सत्य समोर
मुलानेच केला बापाचा खून
Crime

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

दोन महिन्यांपूर्वी वाडेगव्हाण येथील 45 वर्षीय व्यक्तीच्या खूनाचा छडा लावण्यात सुपा पोलिसांना यश आले आहे. मयत सुरेश साहेबराव शेळके (वय 45) यांचा मुलगा प्रतिक सुरेश शेळके (वय 20, रा. वाडेगव्हाण, ता.पारनेर) असे संशयीत आरोपीचे नाव आहे. हा प्रकार 22 एप्रिल रोजी रात्री 10 ते 23 मार्च रोजी पहाटे पाच वाजेच्या दरम्यान घडला होता. खूनाचे कारण प्रतिक याने सांगितले नसले, तरी मयत सुरेश यांना दारूचे व्यसन होते, अशी माहिती समोर आली आहे.

दरम्यान, सुपा पोलिसांनी प्रतिकला शुक्रवारी पारनेर न्यायालयसमोर उभे केले असता त्याला मंगळवार (दि.21) पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, चैताली सुरेश शेळके (वय 41, रा. वाडेगव्हाण) यांनी सुपा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले होते, माझे पती सुरेश शेळके, मुलगा प्रतिक व मुलगी प्रणाली असे आम्ही चौघे एकत्र रहातो. 22 एप्रिल रोजी रात्री 8.30 ला जेवण केल्यावर माझे पती गावात जाऊन येतो, म्हणून गेले. त्यावेळी ते खूप दारु पिलेले होते. आम्ही रात्री 10 वाजता झोपलो. मात्र, पती रात्री घरी आले नाही, म्हणून आम्ही पहाटे वस्तीकडून गावाकडे जाणार्‍या रस्त्यावर शोध घेतला असता ते सर्जेराव थोरात यांच्या शेताच्या कडेला चारीमध्ये जखमी अवस्थेत सापडले.

तेव्हा त्याच्या पोटाला जखम होती आणि त्यातून रक्तस्त्राव सुरू होता. आम्ही त्यांना शिरूरला एका रुग्णालयात नेले, त्यानंतर पुन्हा त्यांना एका दुसर्‍या रुग्णालयात नेले. तेथे प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी त्यांना नगर किंवा पुणे येथे नेण्याचा सल्ला दिला. आम्ही त्यांना नगर येथील हॉस्पिटमध्ये घेऊन आलो. तेथील डॉक्टरांनी रुग्णवाहीकेतच त्यांना तपासल्यवर सुरेश यांना नगरच्या शासकीय रुग्णालयात घेवून जाण्याचा सल्ला दिला. शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी तपासल्यावर डॉक्टरांनी माझे बंधू जयदीप कोळगे यांना सुरेश हे मयत झाले असून त्यांचे शवविच्छेदन करावे लागले असे सांगत शवविच्छदन करून मृतदेह आमच्या ताब्यात दिला.

त्यानूसार सुपा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. त्यानंतर शवविच्छेदन अहवाल आणि शवविच्छेदन करणारे डॉक्टर यांच्या अहवालनूसार सुरेश यांच्या पोटावर धारदार वस्तूने वार करून जखमी केले होते. या माहितीच्या आधारे सुपा पोलिसांनी चौकशी सुरु केली. मयत सुरेश यांचे गावात कुणासोबत वैर अथवा वाद नसल्याचे समोर आले. तर शेजार्‍यांच्या माहितीनूसार या प्रकरणात घरातील कोणाचा तरी हात असल्याचा संशय व्यक्त केला. यामुळे पोलीसांनी सुरेश याच्या कुटुंबातील व्यक्तींची चौकशी सुरू केली. यात मुलगा प्रतिक यांच्या बोलण्यात विसंगती जाणवली. तसेच त्याने शिरूरच्या दोन्ही रुग्णालयात वेगवेगळी माहिती सांगितली असल्याचे तपासात उघड झाले.

अखेर पोलिसांनी प्रतिकला विश्वासात घेतल्यानंतर हा गुन्हा माझ्याकडून घडला असे म्हणत तो रडू लागला. पोलिसांनी त्याला तात्काळ पोलीस ठाण्यात आणले व कसून चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबूली दिली. त्यानंतर प्रतिकला शुक्रवार (दि.17) अटक करण्यात आली आणि त्याच दिवशी पारनेर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास मंगळवार (दि.21) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीने गुन्हात वापरलेले हत्यार पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक डॉ.नितिनकुमार गोकावे करत आहेत. या खूनाच्या तपासात अमोल धामणे, मरकड, छबूराव कोतकर, अकब्बर पठाण, कल्याण लगड, यशवंत ठोबरे या कर्मचार्‍यांनी कामगिरी बजावली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com