
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
खुनाच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या युवकाला दोघांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी रात्री केडगाव बायपास येथे घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात आशितोष संतोष वराडे (वय 21 रा. चिंचवड गाव, ता. हवेली, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनेश्वर राजाराम खेंगरे (रा. हिंजवडी ता. मुळशी, जि. पुणे) व प्रकाश भानुदास नलके (हल्ली रा. हिंंजवडी, पुणे, मूळ रा. ओनिवाडी ता.जत जि. सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास आशितोष वराडे हे केडगाव बायपास येथील रस्त्यालगत असलेल्या एका पानटपरीकडे जात असताना त्यांच्या ओळखीचे धनेश्वर व प्रकाश तेथे आले. त्यांचा साथीदार अकाश लांडगे याचा आशितोष याने साथीदारासह खून केलेला आहे, हा राग मनात धरून अचानक धनेश्वरने,‘तू आकाशची व्हिकेट टाकली, आता तुझी बारी,’ असे म्हणत हातातील सत्तुराने आशितोष यांच्यावर वार केला असता तो वार आशितोष यांनी हुकविला व जीव वाचविण्यासाठी ते पळत सुटले.
धनेश्वर व प्रकाश हे आशितोषच्या मागे पळाले, स्थानिक नागरिकांनी त्यांना पकडले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आशितोषसह धनेश्वर व प्रकाश यांना ताब्यात घेतले. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे करीत आहेत.