
जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed
उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम व शिराढोण पोलीसांना हवे असलेले खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जामखेड शहरात असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी पथक तयार करून त्यांना सूचना देत झडप घालून दोघा आरोपींना जेरबंद केले.
पोलिसांनी शहरातील मिलिंदनगर व कर्जत रोड येथे छापे टाकून भूम पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील महिला आरोपी सुशमिना ईदप्पा ऊर्फ विदुषक काळे (वय 25 रा. सासुबाईचा माळ, ता. भूम, हल्ली मुक्काम मिलिंदनगर,जामखेड) हिस ताब्यात घेऊन उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश पवार व त्यांच्या पथकाकडे पुढील कारवाईसाठी सुपूर्द केले. ही कारवाई पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अजय साठे, पालवे, पळसे, बेलेकर, महिला पोलीस कॉन्स्टेबल सपना शिंदे यांनी केली.
जामखेड तालुका हा गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनलेले आहे. यापूर्वी राज्य परराज्यातील गुन्हेगार पकडून संबंधित पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. मात्र, यापुढे असे चालणार नाही. जामखेड शहरात आश्रयास असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेतला जाणार असून नागरिकांनीही असे गुन्हेगार माहीत असतील तर जामखेड पोलीस प्रशासनाला त्याची माहिती द्यावी. माहिती देणारांचे नाव गुप्त ठेवले जाईल.