
वैजापूर |प्रतिनिधी| Vaijapur
संशयावरून कोयत्याने प्राणघातक हल्ला करून जखमी केल्याप्रकरणी वैजापूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने एकास सात वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आणखी सहा महिने साधी कैद भोगण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
गणेश शामराव थोरात (रा. लखमापूर, ता. गंगापूर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. 2016 मध्ये घडलेल्या घटनेत रामभाऊ शंकर थोरात (वय 30) हे जखमी झाले होते. जिल्हा सत्र न्यायाधीश डी. एम. आहेर यांनी नुकताच हा निकाल दिला.
या प्रकरणाची अधिक माहिती अशी की, लखमापूर येथे रामभाऊ थोरात व गणेश थोरात हे शेजारी राहत होते. 21 मार्च 2016 रोजी रामभाऊ थोरात हे आंघोळ करत असताना गणेश थोरात कोयता घेऊन घरात घुसला व त्याने रामभाऊ यांच्या डोक्यात व खांद्यावर कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात रामभाऊ यांच्या दोन्ही हातांवर गंभीर जखम झाली. याप्रकरणी रामभाऊ थोरात यांनी गणेश याच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर गंगापूर पोलीस ठाण्यात जीवे मारण्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवण्यात आला.
याप्रकरणी वैजापूर येथील सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सहायक सरकारी वकील नानासाहेब जगताप यांनी सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासले. यावेळी आरोपी गणेश थोरात याने अपराध केल्याचे न्यायालयासमोर सिद्ध झाले. जिल्हा सत्र न्यायाधीश डी. एम. आहेर यांनी गणेश थोरात यास सात वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकारी वकील जगताप यांना पोलीस निरीक्षक जी. जे. जामदार व पैरवी अधिकारी बावणे यांनी सहकार्य केले.