
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
पिण्याचे पाणी भरण्याच्या कारणातून झालेल्या वादात एकाला दांडके, दगडाने मारहाण करत कोयत्याने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. खलील यासीन सय्यद (वय 45 रा. चौपाटी कारंजा, अहमदनगर) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी सकाळी चौपाटी कारंजा परिसरात ही घटना घडली.
या प्रकरणी त्याची पत्नी रेश्मा खलील सय्यद (वय 35) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून वसीम फारूख शेख, युसूफ फारूख शेख, कुदुस शेख, रेशम वसीम शेख, यासमिन युसुफ शेख, आशा फारूख शेख (सर्व रा. चौपटी कारंजा) व आक्रम शेख (रा. मुकुंदनगर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खलील सय्यद यांच्या शेजारी वसीम शेख यांचे कुटुंब राहते. खलील यांना जाण्या-येण्यासाठी वसीम यांच्या घरासमोरून रस्ता आहे. वसीमची पत्नी रेशम त्या रस्त्यावर धुणीभांडी करत असते. त्यावरून त्यांच्यात यापूर्वी वाद झालेले आहे. खलील हे वसीम यांच्या विद्युत मोटारीने पाणी भरतात. त्यासाठी ते प्रतिमहा 150 रूपये भाडे देतात.
बुधवारी सकाळी नळाला पाणी आल्यानंतर वसीमने नळाला विद्युत मोटार जोडली. साडेनऊ वाजेच्या सुमारास ती मोटार काढून घेतली. त्यावेळी खलील हे रेशम हिला म्हणाले,‘आम्हाला पिण्यासाठी पाणी भरायचे असून तुम्ही मोटार का बंद केली’, असे म्हटले असता रेशम म्हणाली,‘आमची मोटार आहे, त्यामुळे बंद केली’. त्यावर खलील म्हणाले,‘आम्ही मोटारीचे पैसे देतो, आम्हाला पाणी भरू द्या’, असे म्हणताच रेशम, आशा, यासमिन यांनी खलील यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.
या वादातून खलील यांना सात जणांनी लाकडी दांडके, दगड, फर्शीने मारहाण केले. वसीम शेख याने खलील यांच्यावर कोयत्याने पाठीवर, बरगडीच्या खाली व कमरेच्या वरती हल्ला करून गंभीर जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.