नगरपालिका पाणीपुरवठा विभागाचा गलथान कारभार हजारो लिटर पाणी दररोज जाते वाया

नगरपालिका पाणीपुरवठा विभागाचा गलथान कारभार हजारो लिटर पाणी दररोज जाते वाया

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरवासीयांना स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी प्रसिद्ध असलेली श्रीरामपूर नगरपालिका सध्या अस्वच्छ आणि अपुरा पाणीपुरवठा करीत आहे. शिवाय दररोज विविध भागांमध्ये हजारो लिटर पाणी वाया जात आहे. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभाराने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

शहराच्या विविध भागातील नागरिकांनी पाणीपुरवठा संदर्भात पालिकेकडे अनेकदा तक्रारी केल्या. निवेदने दिली. आंदोलने केली. तरीही पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचार्‍यांवर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता यांची तातडीने बदली करून सक्षम अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.

शहराच्या विविध भागात असलेल्या पालिकेचे जलकुंभ भरल्यानंतर अनेक तास पाणी वाया जाते. संजयनगर, मोरगेवस्ती, कांदा मार्केट या परिसरातील टाक्या भरल्यानंतर अनेक तास पाणी वाया जाते. तेथे कोणताही वॉचमन किंवा पाणीपुरवठा कर्मचारी नसतो. संजयनगर परिसरातील पाण्याची टाकी तर वरूनच ओव्हरफ्लो होते तर मोरगे वस्ती येथील पाण्याच्या टाकीच्या पाईपलाईनमधून ओव्हर फ्लोचे पाणी तासनतास शेजारी शेतात सोडले जाते.

गोंधवणी येथील जलशुद्धीकरण केंद्रातून शहरातील पाण्याच्या टाक्यासाठी जाणार्‍या मेन पाईपलाईनवरील नेहरूनगर येथील वाल्व एक वर्षापासून लीक असून तेथे 24 तास मोठ्या प्रमाणात पाणी वाहते. वैदुवाडा, अहिल्यादेवीनगर परिसरात नागरिकांना मुख्य जलवाहिनीवर नळ कनेक्शन दिल्याने प्रत्येक वेळी तेथे नळांना पाणी येते. दिवसातून पाच वेळा त्या ठिकाणी पाणी येते व पाच वेळा पाणी आल्याने या भागातील नागरिकांच्या नळांना तोट्या नसल्याने तेथही लाखो लिटर पाणी दररोज वाया जाते. शहराला दररोज 40 मिनिटे पाणी पुरवठा केला जातो. शहराच्या सर्व भागातील हे वाया जाणारे पाणी रोखल्यास शहरात एक तास पाणी पुरवठा करता येईल, अशी परिस्थिती आहे. परंतू पाणी पुरवठा विभागाच्या हलगर्जीपणामुळे पाण्याची नासाडी होत आहे.

मिल्लत नगर परिसरातील पाण्याबाबत गेले अनेक महिने बोंबाबोंब सुरू आहे. गेल्या महिन्यात या भागातील जलवाहिनीमध्ये मोठा दगड सापडला. त्यामुळे काही भागात पाणीपुरवठा सुरळीत झाला तर काही भागामधला पाणीपुरवठा एक अत्यंत कमी झाला. याबाबत नगरपालिकेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी अनिल पवार यांनी मागील आठवड्यात झालेल्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीत पाणीपुरवठा विभागाचे अभियंता यांची चांगलीच कानउघाडणी केल्याचे समजते. तरीही त्यात सुधारणा झालेली नाही. मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी याची दखल घेऊन पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजात सुधारणा करावी, अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com