छत्रपतींच्या प्रस्तावित पुतळ्यावरून प्रशासन धारेवर

मनपा ‘स्थायी’ सभेत सभापतींसह नगरसेवक आक्रमक
छत्रपतींच्या प्रस्तावित पुतळ्यावरून प्रशासन धारेवर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महापालिकेच्या आवारात मागील सहावर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचा विषय मांडत आहे. जागा मनपाच्या मालकीची आहे, औरंगाबाद महामार्गाच्या वाहतुकीलाही अडथळा येत नाही, सीसीटीव्ही व रखवालदार असल्याने सुरक्षेचाही प्रश्न नाही तरी शासकीय परवानग्या मिळत नाहीत. मनपा प्रशासनही हा विषय गांभीर्याने घेत नाही, त्यामुळे मनपाच्या आवारात छत्रपतींचा पुतळा तसाच बसवला तर काय होईल, असा सवाल मनपा स्थायी समितीचे सभापती कुमार वाकळे यांनी सभेत केला.

महापालिकेच्या स्थायी समितीची सभा मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनपा आवारात उभारण्यात येणार्‍या प्रस्तावित पुतळ्यावरून गाजली. शहर अभियंता सुरेश इथापे उपस्थित नसल्याने अभियंता मनोज पारखे यांनी पुतळ्या संदर्भातील पाठपुराव्याची माहिती दिली. मात्र, सभापती वाकळे यांनी त्यांच्यासह मनपा उपायुक्त यशवंत डांगे यांना धारेवर धरले. त्यांच्या साथीला नगरसेवक गणेश कवडेंसह सचिन शिंदे, प्रशांत गायकवाड, रवींद्र बारस्कर, रूपाली वारे आदी नगरसेवकांनी येऊन पुतळा उभारण्यात होत असलेल्या दिरंगाईबद्दल नाराजी व्यक्त केली. या नाराजीतूनच सभापती वाकळेंनी, कोणतीही परवानगी न घेता छत्रपतींचा पुतळा तसाच उभारला तर एखादा गुन्हा दाखल होईल व महाराजांसाठी तोही अंगावर घ्यायची तयारी आहे, असे स्पष्ट वक्तव्य केले व त्यांच्या या वक्तव्याला नगरसेवक कवडे यांनीही साथ दिली. यावर काही क्षणातच उपायुक्त डांगे यांनी आक्षेप घेतला व अमरावतीला असा बेकायदा पुतळा उभारल्याने गुन्हा दाखल झाल्याची जाणीव करून दिली.

दरम्यान, मनपातील पुतळा समितीने आधी जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांची राष्ट्रपुरूषांच्या पुतळ्यांच्या उभारणीत येणार्‍या अडचणींबाबत भेट घ्यावी, त्यानंतर मनपाचे पदाधिकारी त्यांना यासंदर्भातच भेटतील व तोपर्यंत मनपा आवारात पुतळा उभारण्याच्या जागेचे सुशोभिकरणाचे काम सुरू केले जावे, असे आदेश सभापती वाकळे यांनी दिले. पुतळ्याची मातीची प्रतिकृती येत्या आठवड्यात तयार होईल व कला संचालनालयाद्वारे त्याची तपासणी होऊन आणि त्यांच्या सुचनेनुसार आवश्यक बदल करून पुतळा महिनाभरात तयार होईल, असे पारखेंनी सांगितले. मनपा आवारातील सुशोभिकरण छत्रपतींच्या पुतळ्यासाठी करायचे असल्याचे वगळून केवळ मनपा आवाराचे सुशोभिकरण, असा विषय घेऊन त्याची निविदा प्रक्रिया सुरू करून ते कामही सुरू करावे, असे आदेश सभापती वाकळेंनी दिले.

दरम्यान, कोविड काळात मनपाला आलेल्या साडेसहा कोटी रुपये निधीतून झालेल्या खर्चाची व काढलेल्या बिलांची सविस्तर माहिती कार्योत्तर मंजुरीच्या निमित्ताने का होईना, पण स्थायी समितीसमोर सादर करावी, अशी अपेक्षा नगरसेवक मुदस्सर शेख यांनी यावेळी व्यक्त केली. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी त्यानुसार कार्यवाहीची ग्वाही दिली.

‘त्या’ गाळेधारकांचे पुनर्वसन गुंडाळले

दिल्लीगेटजवळील 66 गाळे मनपाने 12 वर्षांपूर्वी पाडले होते व त्यांचे आधी पुनर्वसन करा, मग त्यांच्याकडे असलेली संकलित कराची थकबाकी निर्लेखीत करण्याचा फेरप्रस्ताव करण्याचे आदेश 2014 मध्ये स्थायी समितीने दिले होते. मात्र, मनपा प्रशासनाने संबंधित गाळेधारकांचे पुनर्वसन झाले नसल्याची कबुली देत आजच्या स्थायी समितीत त्यांच्याकडील 47 लाखांची थकबाकी निर्लेखीत करण्याचा फेरप्रस्ताव दिला होता. तो सभापती वाकळेंनी एका क्षणात मंजूर केला. पण त्या गाळेधारकांच्या पुनर्वसनावर अवाक्षरही काढले नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com