मनपा ‘स्थायी’ सभापतिपदी कवडे, पाऊलबुध्दे सभागृह नेता

जिल्हाधिकारी सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा
मनपा ‘स्थायी’ सभापतिपदी कवडे, पाऊलबुध्दे सभागृह नेता

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अपेक्षेप्रमाणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदी शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक गणेश कवडे यांची गुरूवारी बिनविरोध निवड झाली व त्यानंतर लगेच शिवसेना ठाकरे गटाच्या महापौर रोहिणी शेंडगे यांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक विनित पाऊलबुद्धे यांना नवे सभागृह नेता म्हणून नियुक्तीचे पत्र दिले. दरम्यान, सभापती झाल्यावर कवडे यांनी लगेच पदभार स्वीकारला तर येत्या दोन-तीन दिवसात पाऊलबुद्धे पदभार स्वीकारणार आहेत.

महापालिका सत्तेत शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी आहेत. त्यांच्या सत्तावाटपात स्थायी समितीचे सभापतीपद राष्ट्रवादीकडे आहे. मात्र, यंदाचे मनपाचे शेवटचे व निवडणुकीचे वर्ष असल्याने शिवसेना ठाकरे गटाने या पदाची मागणी केली होती व त्याबदल्यात शिवसेनेकडे असलेले सभागृह नेतेपद राष्ट्रवादीला देऊ केले होते. हा तोडगा उभयपक्षी मान्य झाल्याने स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी कवडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. समितीच्या 16 सदस्यांमध्ये शिवसेना व राष्ट्रवादीचे प्रत्येकी 5 सदस्य असल्याने व त्यांचेच 10 जणांचे बहुमत होत असल्याने चार सदस्य असलेल्या भाजपने विरोधात उमेदवार उभा करण्याचा विचारही केला नाही व कवडे यांच्या बिनविरोध निवडीला अप्रत्यक्षपणे साथ दिली.

स्थायी समिती सभापती निवडीची विशेष सभा जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी आयुक्त डॉ. पंकज जावळे, नगर सचिव एस. बी. तडवी त्यांना सहायक होते. सभापतिपदासाठी कवडे यांचाच एकमेव अर्ज होता. मात्र, सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या या सभेस खुद्द कवडे यांच्यासह राष्ट्रवादीचे नजीर अहमद शेख उर्फ नजू पहेलवान, सुनील त्रिंबके व विनित पाऊलबुद्धे असे चौघेच सदस्य उपस्थित होते.

पण, मुंबई प्रांतिक मनपा अधिनियमानुसार सभापती निवडीची ही विशेष सभा कोरम अभावी तहकूब वा रद्द करता येत नसल्याने पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी सालीमठ यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू केली. कवडे यांनी भरलेले दोन्ही अर्ज वैध ठरले. त्यानंतर माघारीसाठी 15 मिनिटे वेळ देण्यात आला. या काळात भाजपचे प्रदीप परदेशी व पल्लवी जाधव हे दोन सदस्य आले व नंतर विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर आले. सकाळी साडे अकराच्या सुमारास या सात सदस्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी सालीमठ यांची कवडे यांची सभापतिपदी निवड झाल्याचे घोषित केले. ही घोषणा झाल्यावर नगरसेविका मंगल लोखंडे आल्या. या सभेस स्थायी समितीचे 9 सदस्य अनुपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com