पालिका निवडणुकीत मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी पवारांकडून आग्रह

माजी आ. मुरकुटे काय भूमिका घेणार ? याकडे तालुक्याचे लक्ष
पालिका निवडणुकीत मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी पवारांकडून आग्रह

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

आगामी नगरपालिका निवडणुकीत जास्तीत जास्त नगरपालिका ताब्यात घेेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आतापासूनच ‘फिल्डींग’ लावली आहे. त्याच पार्श्वभूमीवर श्रीरामपूर नगरपालिकेची सत्ता पुन्हा राष्ट्रवादीकडेच रहावी म्हणून वरिष्ठ पातळीपासून प्रयत्न सुरु आहेत. यासाठी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना गळ घातली जात आहे. तसा निरोपही शरद पवार यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामार्फत श्री. मुरकुटे यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आला आहे. मात्र मुरकुटे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पालिकेच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत 29 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने चार जागा पटकावल्या होत्या. नगराध्यक्षपद हे जनतेतून निवडून येणारे होते. त्यावेळी राष्ट्रवादीकडून अनुराधा आदिक यांनी काँगे्रसच्या राजश्री ससाणे यांचा पराभव करत नगराध्यक्षपद पटकावत ही पालिका राष्ट्रवादीकडे ठेवली होती. आज ही पालिका राष्ट्रवादीकडे असली तरी निवडून येणारी सदस्य संख्या खूपच कमी आहे. यावेळेस नगराध्यक्ष हे नगरसेवकांमधून निवड होणार असल्यामुळे बहुमताची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सदस्य संख्याबळ निवडून आणण्यासाठी सर्व बाजुने प्रयत्न केले जात आहेत.

यापूर्वी तालुक्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेले माजी आमदार भानुदास मुरकुटे हे गेल्या पाच वर्षांपासून राष्ट्रवादीपासून दूर आहेत. ते अन्य पक्षात प्रवेश करण्याबाबतच्या वावड्या उठल्या होत्या. मात्र अद्याप मुरकुटे यांनी कोणताही पक्ष निश्चित केला नाही. लोकसेवा विकास आघाडीच्या नावाखाली त्यांनी आपल्या गटाचे अस्तित्व कायम ठेवले आहे.

गेल्या निवडणुकीत ‘शत्रूचा शत्रू हा आपला मित्र’ या भूमिकेतून माजी आ.मुरकुटे यांनी राष्ट्रवादी काँगेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अनुराधा आदिक यांना ताकद दिली. त्यामुळे नगराध्यक्षपदाची माळ आदिक यांच्या गळ्यात पडली. मात्र पालिकेतील निर्णयात माजी आ. मुरकुटे यांचे शब्द डावलले जावू लागल्याने ही आदिक-मुरकुटे युती अल्पकाळाची ठरली. आता काहीही झाले तरी गेल्या वेळी केलेली चूक पुन्हा करायची नाही असा निश्चय माजी आ. मुरकुटे यांनी केला असताना नगरपालिकेत पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता आणण्यासाठी मुरकुटेंनी मदत केली पाहिजे असा आग्रह श्रीरामपूरच्या राष्ट्रवादीने शरद पवार यांच्याकडे धरला आहे. या पार्श्वभूममीवर शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करुन मुरकुटेंना राष्ट्रवादीबरोबरच राहून काम करावे, असा निरोप पाठविण्याची जबाबदारी ना. अजित पवार यांच्यावर सोपविली. त्यानुसार अजित पवार स्वतः भ्रमणध्वनीवर स्वतः श्री. मुरकुटे यांच्याशी बोलले आहे.

मात्र पालिका निवडणुकीनंतर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्टवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांनी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना डावलून पक्षाच्या एबी फॉर्म वर ताबा मिळविला. त्यामुळे आदिक-मुरकुटे संबधात वादाची ठिणगी पडली. हा वाद दिवसेंदिवस वाढत गेला. दुसरीकडे पारंपारिक विरोधक असलेल्या ससाणे गटाशी मुरकुटे यांची जवळीक वाढत गेली. आता पालिका निवडणुकीत मुरकुटे-ससाणे युतीची चर्चाही श्रीरामपूरच्या राजकीय वर्तुळात सुरु असताना पवारांकडून राष्ट्रवादीचे निमंत्रण आले आहे. पण गेल्या पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे आता मुरकुटे काय भूमिका घेतात? हे महत्वाचे ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com