नगर परिषदांचा कच्चा प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश

राज्य निवडणूक आयोगाचे जिल्हाधिकार्‍यांना पत्र
नगर परिषदांचा कच्चा प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यात यापूर्वी मुदत समाप्त झालेल्या व डिसेंबर 2021 ते फेबु्रवारी 2022 या दरम्यान मुदत संपणार्‍या नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे कच्चे प्रारूप तयार करण्याचे आदेश राज्य निवडणुक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी दिले आहेत. त्यानूसार नगर जिल्ह्यातील डिसेंबरमध्ये मुदत संपणार्‍या आठ आणि यापूर्वीच मुदत संपलेली आणि प्रशासक असणारी मात्र नगरपरिषद असणारी जामखेड नगरपरिषदेचा कच्ची प्रभाग रचना तयार होणार आहे.

जिल्ह्यात श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव, राहुरी, देवळाली प्रवरा, राहाता, पाथर्डी, शेवगाव या नगर परिषदेची मुदत डिसेंबरमध्ये संपणार आहे. तर जामखेडची मुदत यापूर्वीच संपलेली आहे. यासह राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानूसार शिर्डी, अकोले, कर्जत आणि पारनेर नगरपंचायतीमधील प्रभाग रचना कार्यक्रम झालेला आहे. दुसरीकडे डिसेंबर 2021 ते फेबु्रवारी 2022 मध्ये मुदत संपणार्‍या नगर परिषदांचा प्रभाग रचनेचा कच्चे प्रारूप करण्याचे आदेश निघाले आहेत. यात अ, ब आणि क या वर्गातील नगरपरिषदांची कच्ची प्रभाग रचना शासनाच्या 1 ऑक्टोबर 2021 च्या अध्यादेशातील तरतुदीनूसार (बहुसदस्यीय प्रभाग पध्दती नूसार) तयार करून ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्य शासनाने 2021 चा महाराष्ट्र अध्यादेशमध्ये अ वर्ग नगरपरिषदेसाठी निवडून आलेल्या सदस्यांच्या संख्येमध्ये 2 ने वाढ केली आहे. तसेच अ वर्ग नगरपरिषदेमध्ये किमान सदस्य संख्या 40 असले आणि 75 पेक्षा अधिक नसले, ब वर्ग नगरपरिषदेसाठी निवडून आलेल्या परिषद सदस्यांच्या संख्येमध्ये 2 ने वाढ केली आहे. ब वर्ग नगरपरिषदेसाठी किमान सदस्य 25 असेल आणि 37 पेक्षा अधिक नसेल. क वगर्र् नगरपरिषदेसाठी निवडून आलेल्या सदस्यांची संख्येमध्ये 3 ने वाढ केलेली आहे. क वर्ग नगरपरिषदेसाठी किमान सदस्य संख्या 20 असले आणि 25 पेक्षा अधिक राहणार नाही, असे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशात स्पष्ट करण्यात आलेले आहेत.

चार नगरपंचायतींचा आजपासून प्रभागनिहाय प्रारूप मतदार कार्यक्रम

जिल्ह्यातील शिर्डी, अकोले, पारनेर आणि कर्जत या चार नगरपंचायतींचा आजपासून प्रभागनिहाय प्रारूप मतदार कार्यक्रम सुरू होणार आहेत. याबाबतचे आदेश निवडणूक आयोगाने 17 नोव्हेंबरलाच काढलेले आहेत. यात 23 तारखेला प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करणे, त्याच दिवसापासून 26 तारखेपर्यंत त्यावर हरकती सुचना घेणे, 29 तारखेला अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी अधिप्रमाणित करून प्रसिध्द करणे आणि 30 नाव्हेंबरला मतदान केंद्राची यादी प्रसिध्द करणे व मतदान केंद्रनिहाय याद्या प्रसिध्द करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com