मनपाच्या सावेडीतील मंगल कार्यालयाची चोरी

माजी विरोधी पक्ष नेत्याचा दावा || चौकशीची मागणी
मनपाच्या सावेडीतील मंगल कार्यालयाची चोरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अहमदनगर महानगरपालिकेच्या निधीतून वैदूवाडी येथे सार्वजानिक मंगल कार्यालयाची उभारणी करण्यात आली होती. मात्र हे मंगल कार्यालया चोरीला गेल्याचा आरोप करत काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे यांनी या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मनपा आयुक्त पंकज जावळे यांच्याकडे केली आहे.

सावेडीच्या वैदुवाडी भागात गेल्या अनेक वर्षांपासून मंगल कार्यालय उभे होते. मनपाच्या निधीतून याची उभारणी करण्यात आली होती. परिसरातील नागरिकांना विविध कार्यक्रमांसाठी याचा उपयोग होत होता. परंतु चांगल्या अवस्थेत असलेल्या या मंगल कार्यालयाची कोणीतरी मोडतोड करून मंगल कार्यालय दोन जेसीबी लावून पूर्णतः जमीनोदोस्त केले आहे. मंगल कार्यालयाचे पत्रे, लोखंड, खिडक्या, राडारोडा, खुर्च्या, टेबल, मंडप साहित्य, सतरंज्या आदी साहित्याची दिवसाढवळ्या चोरी केली असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.

याबाबत शिंदे यांनी काँग्रेसच्यावतीने मनापाचे लक्ष वेधले आहे. याचे फोटो त्यांनी मनपा अधिकार्‍यांना सादर केले आहेत. यापूर्वी देखील जून महिन्यात शिंदे यांनी मनपाकडे याबाबत लिखित तक्रार केली होती. मात्र जवळपास चार ते पाच महिने उलटून गेले, तरी देखील मनपाने याबाबत कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही.

महापालिकेच्या मालमत्तेची झालेली चोरीची घटना शाखा अभियंता मनोज पारखे, शहर अभियंता सुरेश इथापे यांच्या वारंवार निदर्शनास आणून देखील त्यांनी याबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. जनतेच्या पैशातून उभे राहिलेले हे मंगल कार्यालय जर महापालिका सांभाळू शकत नसेल तर महापालिका नेमके करते काय? ही कारवाई करण्याची टाळाटाळ करून मनपा प्रशासनाला नेमके कुणाला पाठीशी घालायचे आहे? असे प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केले आहेत.

शिंदेनी म्हटले आहे की, हे मंगल कार्यालय सुस्थितीत व टिकाऊ होते. ज्यांनी ते जमिनोदोस्त केले त्यांचा यामागे नेमका हेतू काय आहे? ज्यांनी दोन जेसीबी लावून ते पाडून टाकले ते जेसीबी कोणी आणले होते ? जेसीबी कोणाचे होते? जेसीबी चालक कोण होते? याचा शोध घेण्याची गरज आहे. महापालिकेच्या पॅनलवरील आर्किटेक्ट कडून सदर मंगल कार्यालयाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते का? महापालिकेने स्वतः ते पाडले नाही असं महापालिका सांगते. \

मग स्ट्रक्चरल ऑडिट नसताना आणि ते पाडण्याची आवश्यकता किंवा मनपाचे कोणते आदेश नसताना, ते पाडून देखील मनपा मुग गिळून गप्प का बसली आहे? असा सवाल शिंदे यांनी केला असून दहा दिवसांच्या सखोल चौकशी करत संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल न झाल्यास कोणतीही पूर्व सूचना न देता मनपा आयुक्तांच्या दालनात काँग्रेस पक्षाच्यावतीने उपोषण करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com